मोक्याच्या क्षणी बड्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक खेळामुळे राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानच्या संघाला शेवटच्या साखळी सामन्यात विजय आवश्यक होता. पण कोलकाताच्या प्रभावी गोलंदाजीपुढे त्यांचा ६० धावांनी पराभव झाला. १९२ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ १३१ धावांच करू शकला. राजस्थानच्या संघाला १२ गुणांसह IPL 2020 च्या गुणतालिकेत शेवटचं स्थान मिळालं. आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत तळाच्या संघाला मिळालेले हे सर्वात जास्त गुण ठरले.

राजस्थानच्या संघाचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभासोबतच त्यांच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. गुणतालिकेत पहिल्यांदा राजस्थानच्या संघाला तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तसेच आधी IPL विजेता ठरलेला संघ तळाला राहण्याचंही हे पहिलंच वर्ष ठरलं.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत ७२ धावांची भागीदारी केली. तर कर्णधार मॉर्गनने शेवटच्या टप्प्यात ६८ धावांची फटकेबाज खेळी करत संघाला १९१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये तब्बल ५ बळी गमावले. बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि रियान पराग या महत्त्वाच्या फलंदाजांनी स्वस्तात तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर राहुल तेवातियाने काही काळ संघर्ष केला, पण अखेर राजस्थानच्या संघाचा दणदणीत पराभव झाला.