आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून युवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी हा चिंतेचा विषय ठरते आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ, मधल्या फळीत ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरचं फॉर्मात नसणं संघाला चांगलंच महागात पडलंय. मुंबईविरुद्ध सामन्यातही या फलंदाजांनी पुरती निराशा केली. मधल्या फळीत ऋषभ पंतही फलंदाजीत आपली चमक दाखवू शकला नाहीये. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून चर्चेला आलेला पंत आतापर्यंत निराशाच करत आला आहे. परंतू भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या मते ऋषभ पंत कधीच धोनी होऊ शकणार नाही. प्रसारमाध्यमांनी त्याची धोनीशी तुलना करणं थांबवलं पाहिजे.

अवश्य वाचा – आत्मसन्मान नावाची काही गोष्ट असते ! शून्यावर बाद होणाऱ्या पृथ्वी शॉवर भडकले नेटकरी

“प्रसारमाध्यमांना ऋषभ पंतची धोनीशी तुलना करणं थांबवावं लागेल. कारण, मीडिया जेवढं जास्त त्याची तुलना करेल तेवढा जास्त तो या गोष्टीचा विचार करत राहिल. तो महेंद्रसिंह धोनी कधीच बनू शकणार नाही. त्याला ऋषभ पंत म्हणून स्वतःची ओळख बनवावी लागेल. ज्यावेळी आपण धोनीबद्दल बोलतो त्यावेळी त्याचं नेतृत्व, फलंदाजी, यष्टीरक्षण अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा होते. पण ऋषभ पंत फक्त चांगली फटकेबाजी करतो म्हणून त्याची धोनीसोबत तुलना होते, हे थांबायला हवं.” गौतम गंभीर ESPNCricinfo शी बोलत होता.

यंदाच्या हंगामात ऋषभ पंतची फलंदाजी ही अतिशय खराब झाली असून गौतम गंभीरच्या मते ऋषभला आपल्या यष्टीरक्षणावर अधिक काम करण्याची गरज आहे. यष्टींमागची ऋषभ पंतची कामगिरी अगदीच सुमार होती असं मत गंभीरने व्यक्त केलं. मुंबईविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दिल्लीला आता हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यातील विजेत्यासोबत दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात खेळावं लागणार आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ आता आपल्या रणतिनीत काय बदल करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader