आयपीएलचा तेरावा हंगाम अखेरीस आपल्या उत्तरार्धात पोहचला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं असून गुरुवारी त्यांचा सामना अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. RCB वर मात करुन दिल्लीने आपलं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादविरुद्ध सामन्यात पुनरागमन केलं आहे. मात्र या सामन्यातही त्याला आपली चमक दाखवता आली नाही. दिल्लीच्या संघाने याचा फायदा घ्यायचं ठरवलं आहे.

“रोहित खूप चांगला खेळाडू आहे, पण यंदा त्याला फारसे सामने खेळायला मिळालेले नाहीत, त्यामुळे तो सध्या कुठल्या फॉर्मात आहे हे मला माहिती नाही. पण आम्ही या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. प्ले-ऑफच्या सामन्यासाठी माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. पण गुरुवारी आम्ही एकमेकांच्या विरोधात उतरणार आहोत, त्यामुळे एकमेकांच्या कमजोर बाजूंचा अभ्यास करुन आम्ही नक्कीच रणनिती आखणार आहोत.” पहिल्या प्ले-ऑफ सामन्याआधी शिखर प्रसारमाध्यमांशी बोलत होता.

मुंबईचा संघ आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत आश्वासक खेळ करत आला आहे. त्यामुळे पहिल्या प्ले-ऑफमध्ये त्यांचं पारडं जड असेल का असं विचारलं असता शिखर धवनने नकारार्थी उत्तर दिलं. “मुंबईचं पारडं जड असेल असं मला वाटत नाही. आमचा संघ अनुभवी आणि उत्तम आहे, कोणत्याही संघाला आम्ही हरवू शकतो. आम्हाला फक्त चांगला खेळ करायचा आहे आणि आम्ही जी रणनिती आखू त्यानुसार खेळ करायचा आहे. हे केलं तर आम्ही नक्की जिंकू असा मला विश्वास आहे.” त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Story img Loader