IPL 2020 मध्ये विराट कोहलीच्या RCBविरूद्ध आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना आहे. मुंबई आणि बंगळुरू दोन्ही संघ १४ अंकांसह सध्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल, त्या संघाचे प्ले-ऑफ्सचे तिकीट पक्के होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात रोहित शर्माला वगळण्यात आलं. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेच. पण त्याचसोबत विराट आणि BCCIने मिळून रोहितसोबत गलिच्छ राजकारण केलं असल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील रोहित विरूद्ध विराट सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पण या साऱ्या गोंधळात रोहित नक्की काय करतोय हे त्याने फोटो पोस्ट करत सांगितले.
रोहित शर्मा गेले दोन सामने दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पंजाबविरूद्धच्या सुपर ओव्हरमध्ये रोहितच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली. त्यानंतर पुढील दोन सामने कायरन पोलार्डने संघाचे नेतृत्व केले. पण परवा रोहित नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला. त्यामुळे रोहित बंगळुरू विरूद्धचा सामना खेळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान, रोहितने बंगळुरूविरूद्धच्या सामन्याआधी एक फोटो पोस्ट केला. त्यात तो पत्नी रितिकासोबत दुबईच्या एका बीचवर निवांत वेळ घालवताना दिसला. “समुद्र किनाऱ्यावरील एक सुंदर आणि शांत संध्याकाळ”, असे कॅप्शनही त्याने फोटोला दिलं.
रोहितला संघातून वगळल्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत BCCIची वैद्यकीय समिती देखरेख ठेवत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मुंबई इंडियन्सने रोहितच्या फलंदाजीचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे BCCI आणि निवड समितीने मुद्दाम रोहितला डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.