इतिहासात पहिल्यांदाच IPLची अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघापुढे आज चार वेळा IPL विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले. तीनही सामन्यात मुंबईने दिल्लीला मात दिली. आता आज होणाऱ्या अंतिम सामन्यातही मुंबईच्या संघाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे. अशा वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मुंबईच्या संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत सचिनने मुंबईच्या संघासाठी एक महत्त्वाची सकारात्मक गोष्ट सांगितली आहे. “मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब आहे. IPLसारख्या स्पर्धेचा वेग हा प्रचंड असतो. अशा वेगवान स्पर्धेत अनेक अडथळे आणि आव्हानं असतात. पण संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा”, असा सल्ला सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून दिला.

पाहा व्हिडीओ…

“अंतिम फेरीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगात सगळ्यांनी एकसंध राहण्याची गरज आहे. तुम्ही सारे हे नक्कीच करू शकाल. संघाच्या मालकांपासून ते सहाय्यक कर्मचारी वर्गापर्यंत सारेच तुम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे”, असे प्रेरणादायी विचार सचिनने व्यक्त केले.