श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये आश्वासक सुरुवात केली. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला दिल्लीचा संघ गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे खाली घसरला. प्ले-ऑफच्या शर्यतीत दिल्लीचं आव्हान अजुनही कायम आहे. लागोपाठ ३ पराभव झाले म्हणून संघ वाईट ठरत नाही असं म्हणत दिल्लीचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने आगामी सामन्यात संघ आश्वासक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

“आम्ही सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. ९ पैकी ७ सामने जिंकत आम्ही चांगल्या फॉर्मात होतो. गेल्या ३ सामन्यांमध्ये आमच्या रणनितीप्रमाणे काही घडत नाहीये. पण आयपीएल सारख्या स्पर्धेत असं होणं अपेक्षित असतं. साखळी फेरीत तुम्हाला १४ सामने खेळायचे असतात, ही खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे सातत्य कायम राखणं ही प्रत्येक संघासाठी मोठी आव्हानात्मक गोष्ट असते. पुढील दोन सामने आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आम्ही सकारात्मक आहोत. सलग तीन सामने गमावल्यामुळे संघ वाईट ठरत नाही. आम्ही आमच्यातली क्षमता ओळखून एकमेकांना चांगला पाठींबा देत राहिलो तर आम्ही नक्कीच फॉर्मात येऊ.” मुंबईविरुद्ध सामन्याआधी अजिंक्य रहाणेने संघाच्या तयारीबद्दल माहिती दिली.

शनिवारी दिल्लीचा सामना प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झालेल्या मुंबई इंडियन्ससोबत असणार आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून खेळणं गरजेचं असल्याचंही अजिंक्य म्हणाला. मुंबईचा संघ तुल्यबळ असला तरीही दिल्लीचे खेळाडू विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरतील असं अजिंक्यने स्पष्ट केलं.