आयपीएलच्या तेराव्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या RCB ची गाडी नंतर रुळावरुन घसरली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही रनरेटचं गणित सांभाळल्यामुळे विराटसेनेला प्ले-ऑफ चं तिकीट मिळालं. मात्र त्यानंतरही हैदराबादविरुद्धच्या सामन्यात RCB चा निराशाजनक खेळ सुरु राहिला. तेराव्या हंगामात RCB चं आव्हान संपुष्टात आल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी RCB च्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला हटवण्याची मागणी केली. परंतू विरेंद्र सेहवागने विराटची पाठराखण करत RCB चं टीम मॅनेजमेंट नेतृत्वबदल करणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराट कोहलीसारखा कर्णधार मिळणं हे आमचं भाग्यच !

“विराट ज्यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करत असतो त्यावेळी तो चांगले निकाल देतो. वन-डे, टी-२० असो किंवा कसोटी तो संघाला सामने जिंकवून देतो. पण ज्यावेळी तो RCB चा कर्णधार म्हणून मैदानात उतरतो त्यावेळी संघ चांगली कामगिरी करत नाही. एका कर्णधाराला तितकीच चांगली टीम मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे मला आशा आहे की RCB चं टीम मॅनेजमेंट नेतृत्वात बदल करण्याऐवजी संघ अधिक कसा सुधरवता येईल याकडे लक्ष देईल.” Cricbuzz शी बोलत असताना सेहवागने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !

दरम्यान RCB च्या संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच आणि डिरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन यांनीही विराटला आपला पाठींबा दर्शवला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोहलीने १५ सामन्यांत ४५० धावा केल्या. परंतू महत्वाच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळत करत RCB ने यंदा आपल्या चाहत्यांना विजेतेपदाची स्वप्न दाखवली होती. परंतू सलग ५ सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा RCB च्या चाहत्यांची निराशा झाली.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराट कोहली सांगणार नाही, मॅनेजमेंटला निर्णय घ्यावा लागेल !