दिल्लीविरूद्धच्या प्ले-ऑफ्सच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी तुफान धुलाई करत ५ बाद २०० धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव (५१) आणि क्विंटन डी कॉक (४०) जोडीने संघाचा भक्कम पाया रचला. तर शेवटच्या टप्प्यात इशान किशन (नाबाद ५५) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ३७) या जोडीने २३ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला २०१ धावांचं आव्हान दिलं. अश्विनने चांगली गोलंदाजी करत ३ बळी टिपले.
मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी दमदार अर्धशतके ठोकली. पण खरी चर्चा हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीची झाली. हार्दिकने शेवटच्या टप्प्यात फलंदाजीला येत तुफान फटकेबाजी केली. त्याने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा कुटल्या. या खेळीत त्याने एकही चौकार लगावला नाही. पण २६४च्या स्ट्राईक रेटने तब्बल ५ उत्तुंग षटकार खेचले.
पाहा हार्दिकची तुफान फटकेबाजी…
दरम्यान, नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.