सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
कगिसो रबाडाने लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत ४ बळी टिपले पण सामन्याचा हिरो ठरला मार्कस स्टॉयनीस. त्याने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. फलंदाजीत बढती मिळाल्यावर सलामीवीर मार्कस स्टॉयनीसने ५ चौकार आणि १ षटकार ठोकत ३८ धावा ठोकल्या. तो मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असतानाच त्रिफळाचीत झाला.
गोलंदाजीतही त्याने दमदार कामगिरी केली. प्रियम गर्ग आणि मनिष पांडे या दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असतानाच स्टॉयनीसने एका षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. आधी प्रियम गर्ग १७ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर शेवटच्या चेंडूवर मनिष पांडे २१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर हैदराबाद हुकुमी एक्का ठरू पाहणारा केन विल्यमसन यालाही त्याने रबाडाकडे झेल देण्यास भाग पाडले. स्टॉयनीसने ३ षटकात २६ धावा देत ३ गडी टिपले.
दरम्यान, आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे.