आयपीएलचा तेरावा हंगाम उत्तरार्धाकडे झुकत चाललेला असताना युएईत महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेत आज नकोशा विक्रमाची नोंद झाली. गतविजेत्या सुपरनोव्हाजवर मात करुन स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या वेलॉसिटी संघाला दुसऱ्याच सामन्यात धक्का बसला आहे. स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सच्या माऱ्यासमोर मिताली राजचा वेलॉसिटी संघाचा डाव ४७ धावांत संपुष्टात आला. महिला टी-२० स्पर्धेतली ही निचांकी धावसंख्या ठरली.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेलॉसिटी संघाची सुरुवात खराब झाली. अनुभवी झुलन गोस्वामीने शेफाली वर्माचा १३ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर वेलॉसिटीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. डॅनी वॅट, मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, सुषमा वर्मा अशा सर्व नावाजलेल्या फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्या. ट्रेलब्लेझर्सकडून सोफी एस्कलस्टोनने ४, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी २-२ तर दिप्ती शर्माने १ बळी घेतला.
विजयासाठी अवघ्या ४८ धावांचं आव्हान मिळालेल्या ट्रेलब्लेझर्सची सुरुवातही खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना लेह कास्परेकच्या गोलंदाजीवर ६ धावा काढून माघारी परतली. मात्र यानंतर डेंड्रा डॉटीन आणि रिचा घोष यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत ट्रेलब्लेझर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.