आयपीएलचा तेरावा हंगाम उत्तरार्धाकडे झुकत चाललेला असताना युएईत बुधवारपासून महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात मिताली राजच्या वेलॉसिटी संघाने गतविजेत्या हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज संघावर ५ गडी राखून मात केली आहे. १२७ धावांचा पाठलाग करताना वेलॉसिटी संघाकडून मधल्या फळीत सुषमा वर्माने ३४ तर सुने लूसने नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली.
हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज संघाने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चमारी अट्टापट्टु आणि प्रिया पुनिया या जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र प्रिया पुनिया ११ धावा काढून माघारी परतली. भारताची जेमायमा रॉड्रीग्जही अवघ्या ७ धावा काढून एकता बिश्तच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अट्टापट्टु यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. मैदानात जम बसलेल्या अट्टापट्टुला जहानरा आलमने माघारी धाडलं, तिने ४४ धावा केल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही ठराविक अंतराने माघारी परतली. दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर अखेरच्या फळीतल्या खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही आणि सुपरनोव्हाजच्या संघाने १२६ धावांपर्यंत मजल मारली. वेलॉसिटीकडून एकता बिश्तने ३ तर जहानरा आलम आणि लेग कासपरेकने प्रत्येकी २-२ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल वेलॉसिटीच्या संघाची सुरुवात खराब झाली. भरवशाची डॅनी वॅट अयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतली. पाठोपाठ युवा शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राजही ठराविक अंतराने माघारी परतल्या. यानंतर वेदा कृष्णमुर्ती आणि सुषमा वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी मोलाची भागीदारी करत वेलॉसिटीचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावतेय अस वाटत असतानाच वेदा राधा यादवच्या गोलंदाजीवर बाद झाली, तिने २९ धावा केल्या. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सुने लूसने सुषमा वर्माला भक्कम साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली भागीदारी करत सुपरनोव्हाजला पुनरागमन करु दिलं नाही. सुषमा वर्मा ३४ धावा काढून माघारी परतली परंतू सुनेने अखेरपर्यंत मैदानावर स्थिरावून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सुपरनोव्हाजकडून अयाबोंगा खाकाने २ तर शाकेरा सेलमन, राधा यादव आणि शशिकला श्रीवर्धने यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.