MS Dhoni, IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एम.एस. धोनी मैदानावरील शांत स्वभावासाठी ओळखला जातो. कधी-कधी ‘कॅप्टन कूल’ सामना सोडून इतर सहकारी खेळाडूंसोबत विनोद करतानाही दिसतो पण तो कधीही चिडत नाही. मात्र, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दीपक चाहरच्या कानाखाली सहज विनोदाने चापट मारताना दिसत आहे.
धोनीने दीपक चाहरवर उचलला हात
वास्तविक, दीपक चाहर सीएसकेचे बॉलिंग कोच ड्वेन ब्राव्हो यांच्याशी बोलत होता, जेव्हा धोनी जवळून गेला तेव्हा चाहरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. धोनी पुढे जावू लागला, मग अचानक त्याला काय वाटलं काय माहिती की, त्याने दीपक चाहरला मारण्यासाठी हात वर केला. धोनीने अचानक हात वर केल्याने चाहर घाबरला नंतर हळूच माहीने त्याच्या गालावर लाडाने चापट मारली आणि मग एकच हशा पिकला. हे सर्व संघातील सहकारी त्यावेळी चेष्टा-मस्करी करत होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनीने टॉस जिंकला तेव्हा दीपक चाहर त्याच्याकडे आला होता. माही त्याला चापट मारण्याचा प्रयत्न करतो पण चाहर तो हात थोडक्यात वाचवतो. मग माही हसत पुन्हा त्याला कानाखाली सहज चापट मारतो आणि तिथून निघून जातो. हा व्हिडिओ पाहून चाहते जोरदार कमेंट्स करत आहेत. दीपक चाहरने मुलाखतीत अनेकदा सांगितले आहे की चेन्नई सुपर किंग्जच्या संघात तो धोनीवर सर्वात जास्त प्रेम करतो आणि धोनीलाही तो खूप आवडतो पण कधी-कधी अनेक चुकांवरून त्याला सर्वाधिक फटकारले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता
बुधवारी चेपॉक येथे चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला होता. धोनी टॉसच्यावेळी म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू, आम्ही या विकेटवर काही सामने खेळले आहेत. विकेट नंतर स्लो होण्याची शक्यता आहे. आम्ही या ट्रॅकबद्दल तक्रार करू शकत नाही. आम्ही आमच्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू.” धोनीने तसेच करून दाखवले आणि सामन्यात शानदार विजय मिळवला.
चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी सामना जिंकला
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर २० षटकात ८ बाद १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे पहिले तीन गडी लवकर परतले. मधल्या फळीत रिले रुसो व अक्षर पटेल यांनी वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तसेच, चेन्नई प्ले ऑफ्ससाठी पात्र होण्यापासून केवळ एक अंक दूर आहे.