आयपीएल २०२३ मध्ये १ मे रोजी खेळलेला ४३वा सामना दीर्घकाळ स्मरणात राहील. हा सामना आरसीबीने जिंकला. या विजयापेक्षा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या लढाईची चर्चा झाली. या वादानंतर बीसीसीआयने विराट, गंभीर आणि नवीन उल हक यांना आयपीएल आचारसंहितेअंतर्गत दंडही ठोठावला आहे. आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने या लढतीबाबत ‘गंभीर’ विधान केले आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन म्हणाला की, “विराट आणि गंभीर यांच्यात जे काही घडले ते क्रिकेटसाठी चांगले नाही. मी श्रीशांतबाबत जे केले त्याची मला आजही लाज वाटते. माहितीसाठी की २००८च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने श्रीशांतला कानाखाली चापट मारली होती, ज्यासाठी श्रीशांतवर दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती आणि हरभजनला ही दंड ठोठवण्यात आला होता. याचा संदर्भ देत हरभजन म्हणाला की, “२००८ मध्ये माझ्या आणि श्रीशांतमध्ये असेच काहीसे घडले होते. आज १५ वर्षांनंतरही मला हा विचार करताना खूप लाज वाटते कारण हे सगळे भावनेच्या भरात झाले होते.
हरभजन सिंग म्हणाला, “आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हस्तांदोलन केल्यानंतर गंभीर विराटवर भडकतो. आता बघा यात विराट नवीनचा हात झटकण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर जेव्हा नवीनने विराटशी हस्तांदोलन केले तेव्हा त्याने हात सोडला नाही. दोघांमध्ये काही संवाद झाला आणि हे व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नक्की काय संभाषण घडले हे आम्हाला माहित नाही. दोघांमधील संवाद इतका मोठा होता ते जाणून घ्यायला थोडा वेळ लागेल.”
हरभजन सिंगने आपली चूक मान्य केली
श्रीसंतला थप्पड मारण्याच्या घटनेवर हरभजन म्हणाला की, “त्यावेळी मला वाटले की जे काही झाले ते मी योग्यच केले आहे. पण नाही, मी जे केले ते चुकीचे होते.’ या घटनेनंतर काही वर्षांनी हरभजन आणि श्रीशांत हे २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते. योगायोगाने गंभीर आणि कोहली दोघेही त्या संघात होते. आयपीएलमध्ये एकमेकांबद्दल शत्रुत्वाचा इतिहास असलेल्या कोहली आणि गंभीरच्या मनात अनेक वर्षांनंतरही तीच भावना असावी असे मला वाटत नाही,” असे हरभजन म्हणाला.
आयपीएलच्या ४३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना त्यांच्या सामना फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही या वादात उतरला आहे.