Kapil Dev on Virat and Gambhir: लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात खडाजंगी झाली. गंभीर आणि कोहली यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे. त्यावादावर आता भारताचे माजी दिग्गज विश्वचषक जिंकवून देणारे खेळाडू कपिल देव यांनी मोठे विधान केले आहे.
आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. रिपोर्टनुसार, कोहलीला आक्रमक पाहून गंभीर त्याच्या दिशेने सरकला आणि प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कोहली म्हणाला की, मी तुम्हाला काहीच बोललो नाही. यानंतर हे प्रकरण पुढे गेले. त्यानंतर खेळाडूंनी प्रकरण शांत केले. यावर कपिल देव यांनी “भारतीय क्रिकेटची मान शरमेने खाली गेली आहे”, असे म्हणत त्या घटनेवर टीका केली आहे.
कपिल देव पुढे म्हणाले की, “ते दोघेही (गौतम गंभीर आणि विराट कोहली) परिपक्व आहेत आणि हे समजून घेतले पाहिजे की युवा खेळाडू त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित होते. भारतीय क्रिकेटची जबाबदारी या खेळाडूंवरच आहे आणि त्यांनी घेतली पाहिजे. मी (घटना) पाहिली नसल्याने कोण बरोबर की चूक हे मला माहीत नाही पण क्रिकेटचा अँबेसेडर म्हणून त्यांनी खेळाबद्दल आदर दाखवलाच पाहिजे. लाखो लोक त्यांना पाहत आहेत आणि त्यांनी असे काहीतरी केले पाहिजे ज्याचा लोकांना अभिमान वाटेल.”
१९८३चा विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव म्हणाले की, “८०च्या दशकात, अहमदाबाद हे एक वाढणारे शहर होते आणि आता ते खरोखरच विकसित झाले आहे. मी एसजी हायवेवर होतो, जिथे आधी जवळपास काहीच नव्हते, पण आता ते शहरातील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. मला शहराचे वातावरण आवडते आणि येथील लोक आपुलकी, माया, प्रेम देणारे असे आदरणीय आहेत.”
पुढे कपिल देव म्हणाले की, “तरुणांना क्रिकेट खेळण्याची आवड असली पाहिजे. एका रात्रीत क्रिकेटर बनण्याचा प्रयत्न करू नका; यास वेळ लागतो आणि जास्त काळ तुम्ही कसे लोकांमध्ये आठवत राहाल यासाठी तुम्हाला धीर धरणे, संयम बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके तुम्ही चांगले खेळाडू व्हाल आणि तुमची कामगिरी तुमच्या खेळातून बोलेल. आजच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूच असे वागत असल्यास तुम्ही तरी काय आदर्श घेणार? याचा विचार करायला हवा.”
कोहली -गंभीर वाद नेमका काय आहे?
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान कोहली अतिशय आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. गौतम गंभीरला त्याची ही पद्धत आवडली नाही. यानंतर सामन्यात नवीन-उल-हक आणि अमित मिश्रासोबत वाद झाला. सामना संपल्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात वाद वाढला. इनसाइड स्पोर्टवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गंभीरने कोहलीला विचारले, “क्या बोल रहा है बोल?” विराटने उत्तर दिले, “मी तुला काही सांगितले नाही, तू का मध्ये बोलत आहेस?” कोहलीच्या उत्तरानंतर गंभीरने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाला, “तुने अगर मेरे खिलाड़ी को बोला है, अर्थात तू माझ्या कुटुंबातील, संघातील खेळाडूला शिवी दिली.” यावर कोहली म्हणाला, “तर तू तुझ्या कुटुंबाची काळजी घे.” गंभीर म्हणाला. “म्हणजे आता तू मला शिकवशील.” यातून तो वाद वाढत गेला.