आयपीएल २०२३च्या ६३व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्सवर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ पाच गडी गमावून केवळ १७२ धावा करू शकला आणि सामना गमावला. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार क्रुणाल पांड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले. मुंबईकडून इशान किशनने ५९ आणि रोहित शर्माने ३७ धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद ३२ धावा केल्या. लखनौच्या यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामन्यानंतर क्रुणाल-स्टॉयनिस यांच्यातील मजेशीर गप्पांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सामन्यानंतर क्रुणाल पांड्याने मार्कस स्टॉयनिसचे केले कौतुक
आयपीएलच्या ट्वीटर हँडलने क्रुणाल पांड्याने मार्कस स्टॉयनिस यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात स्टॉयनिस कर्णधार क्रुणाल पांड्याला विचारतो, “आता कसं वाटत आहे, तुझी दुखापत आता कशी आहे?” यावर पांड्या म्हणतो की, “सामना जिंकल्यानंतर थोडं आता बर वाटत आहे. माझी दुखापत पहिलेपेक्षा थोडी बरी झाली आहे. सामना जिंकल्यामुळे मनावरील ओझे कमी झाले असून हायसं वाटत आहे.” पुढे पांड्या म्हणतो, “स्टॉयनिस तुझ्या अफलातून फलंदाजीमुळे आज लखनऊने सामना जिंकला. तू केलेली शेवटच्या काही षटकातील फलंदाजी संघाला कामास आली.”
क्रुणाल पांड्याने मोहसीनच्या गोलंदाजीचे देखील कौतुक केले. तो म्हणाला की, “ मोहसीनने टाकलेले शेवटचे षटक संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन जायला कामी आले. तो जवळपास एक वर्षापासून दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याच्यासाठी आणि संघासाठी हा खूप मोठा भावनिक क्षण होता.” यावर स्टॉयनिस म्हणतो की, “मोहसीन हा खरच एक उत्कृष्ट गोलंदाज असून आयपीएलने भारतीय संघाला दिलेली एक देण आहे. आयपीएलमुळे अनेक नवीन खेळाडू तयार झाले. आता संघाचा विजय झाल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत.”
या विजयासह लखनऊ संघ १५ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून मुंबईला मागे टाकण्याची आरसीबीला संधी आहे. त्याचवेळी, चेन्नईचा संघ आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून दुसऱ्या स्थानावर राहू शकतो. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. इतर सर्व संघांना अंतिम चारमध्ये जाण्यासाठी उर्वरित साखळी सामने जिंकावे लागतील.