IPL 2023, Shubaman Gill: यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल, शुबमन गिलची बॅट सगळीकडे तळपली. गिलने या वर्षात आतापर्यंत ९ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२३मध्ये ३ तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२३मध्ये आतापर्यंत गिलने १६ सामन्यात ८५१ धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि जोस बटलरनंतर हा आकडा गाठणारा तो तिसरा फलंदाज आहे. मात्र, या उत्कृष्ट कामगिरीनंतरही माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव शुभमन गिलवर समाधानी नाही. कपिल देव यांनी गिलबद्दल असे वक्तव्य केले आहे की ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
कपिल देव यांनी शुबमन गिल मोठे वक्तव्य केले
भारताचा माजी कर्णधार कपिला देव यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यादरम्यान कपिल देव शुबमन गिलबद्दल बोलले. कपिल देव म्हणाले, “सुनील गावसकर आले, सचिन तेंडुलकर आले, मग राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली चमकले. गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यावरून तो या खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसते. पण त्याच्याबद्दल मोठे दावे करण्यापूर्वी मी त्याला आणखी एक हंगामात चांगली कामगिरी करून दाखवण्याचे आव्हान देऊ इच्छितो.”
ते पुढे म्हणतात, “त्याच्याकडे टॅलेंट आहे पण सध्या त्याची तुलना मोठ्या खेळाडूंशी होणार नाही. त्याने आणखी एका हंगामामध्ये अशी कामगिरी करावी जेणेकरून आपण म्हणू शकतो की तो गावसकर, सचिन आणि कोहली यांच्यानंतर आहे. एक किंवा दोन चांगल्या हंगामानंतर गोलंदाजांना तुमची ताकद आणि कमकुवतपणा कळतो. पण जर त्याच्याकडे तीन किंवा चार चांगले हंगाम असतील तर आपण म्हणू शकतो की तो खरोखर महान आहे.”
कपिल देव यांनी सूर्यकुमार यादवचे कौतुक केले
कपिल देव पुढे म्हणाले, ‘शुबमन गिल सध्या चांगल्या टप्प्यात आहे. अशी कामगिरी तो किती दिवस सुरू ठेवू शकतो हे पाहावे लागेल. , जरा सूर्यकुमार यादवकडे बघा. मोठ्या हंगामानंतर त्याला तीन वेळा भोपळाही फोडता आला नाही. मात्र, त्याने दमदार पुनरागमन केले. तुम्ही अशाच खेळाडूंना उच्च दर्जा देता. मला उत्सुकता आहे की गिलची चांगली धावसंख्या संपल्यावर तो कसा पुनरागमन करेल? त्याच्यात सर्व गुण आहेत. चौकार न मारताही तो घाबरत नाही ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे.”
कपिल देव यांनी विनोद कांबळी यांचे उदाहरण दिले
पुढे, विनोद कांबळीचे उदाहरण पाहून माजी क्रिकेटपटू म्हणाले, “माझ्या व्यक्तव्याला चुकीच्या अर्थाने घेऊ नका. त्याच्या क्षमतेबद्दल मला शंका नाही. पण मी एका क्रिकेटपटूचा उल्लेख करू इच्छितो, ज्याचे नाव आहे विनोद कांबळी. सुरुवात चांगली झाली पण नंतर गाडी रुळावरून घसरली. अशा परिस्थितीत गिलच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असेल की तो स्वत:ला नीट सांभाळू शकेल का? तरुण वयात तो कसा सामना करेल?”
गिलची तुलना सचिन-कोहलीशी केली जात आहे
शुबमन गिलची कामगिरी पाहून भारतीय चाहते त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसोबत करू लागले आहेत. अशा परिस्थितीत कपिल देव यांनी केलेले वक्तव्य भारतीय चाहत्यांना धक्का देणारे ठरू शकते. मात्र कपिल देव यांच्यामते त्यांचे वक्तव्य सकारात्मकरित्या घेऊन शुबमन गिलने प्रगती करावी. आता यापुढे शुबमन गिलची कामगिरी कशी असेल हे बघणे देखील महत्वाचे ठरेल .