IPL 2023, GT vs CSK Cricket Update : आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्याचा थरार गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने त्यांच्या प्लेईंग-११ मध्ये आयरलॅंडचा खेळाडू जोशुआ लिटिलला सामील केलं आहे. पण आजच्या सामन्यात या खेळाडूची इतिहासात नोंद झालीय. कारण जोशुआ लिटिल आयपीएलमध्ये खेळणारा आयरलॅंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी आयरलॅंडचा कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये खेळला नाही.
गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ च्या मिनी ऑक्शनमध्ये जोशुआ लिटिलला बेस प्राइसहून अधिक रक्कम देत खरेदी केलं. जोशुआची बेस प्राइस ४० लाख होती. पण गुजराने जोशुआला ४ कोटी ४० लाख रुपये देऊन खरेदी केलं. आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या जोशुआ लिटिलने याआधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी नेट गोलंदाज म्हणून कामगिरी केली होती.
जोशुआने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये विकेट हॅट्रिक घेत धमाका केला होता. टी-२० विश्वकपमध्ये न्यूझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात त्याने केन विलियमसन, जिमी नीशम आणि मिचेल सेंटनरला बाद केलं होतं. जोशुआने आयरलॅंडसाठी ५२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये जोशुआने ६२ विकेट्स घेतले आहेत. याशिवाय आयरलॅंडसाठी खेळलेल्या २५ वनडे सामन्यात त्याने ३८ विकेट घेतले आहेत.