मागील काही सामान्यांपासून चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सातत्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतो आहे. रविवारी झालेल्या पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने ९ व्या क्रमाकांवर फलंदाजी येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, धोनीच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर आता अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. या निर्णयावर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
काय म्हणाला इरफान पठाण?
स्टार स्पोर्टवरील एका कार्यक्रमात बोलताना इरफान पठाणने यासंदर्भात भाष्य केलं आहे. “मला माहिती आहे की धोनीचं वय आज ४२ वर्ष आहे. मात्र, तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याने जबाबदारी घेऊन मधल्या फळीत फलंदाजी करणे आवश्यक आहे. त्याने किमान चार ते पाच षटके फलंदाजी करणं गरजेचं आहे. त्याने केवळ फिनिशर म्हणून आपली भूमिका पार पडून नये”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
पुढे बोलताना तो म्हणाला, “धोनी सध्या शेवटच्या एक किंवा दोन षटकात फलंदाजीला येतो आहे, त्यामुळे चेन्नईच्या संघाचे नुकसान होत आहे. अशाने चेन्नईचा दिर्घकालीन हेतू कधीही साध्य होणार नाही, त्यामुळे कोणीतरी धोनीला सांगाव की त्याने किमान चार किंवा पाच षटकं तरी फलंदाजी करावी”
हरभजन सिंगनेही व्यक्त केली नाराजी
दरम्यान, धोनीच्या फलंदाची क्रमवारीवरून भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यानेही नाराजी व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल, तर त्याने खेळू नये. त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश केला, तर ते योग्य ठरेल. माही निर्णय घेणारा माणूस आहे आणि त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला न आल्याने आपल्या चाहत्यांची निराशा केली आहे.”
हेही वाचा – IPL 2024: कोलकाताचा लखनऊवर मोठा विजय, ९८ धावांच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी
“शार्दुल ठाकूर कधीही महेंद्रसिंग धोनीसारखे फटके मारू शकत नाही. त्यामुळे धोनीने ही चूक का केली हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही आणि फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याचा हा निर्णय दुसऱ्या कोणीतरी घेतला यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. धोनीने गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी झटपट धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला याच गोष्टीची गरज होती.” अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.