Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स संघाला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध १० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अधिक धुसर झाल्या आहेत. पण मुंबईने त्यांच्या उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. दिल्ली विरूद्धच्या या सामन्यानंतर संघाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला मोठा धक्का बसला आहे. इशानवर कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशानवर कारवाई केली आहे. यासोबतच त्याला मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. इशानने देखील आपली चूक मान्य केली आहे.
आयपीएलच्या निवेदनानुसार, “किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे आणि पंचांनी ठोठावलेला दंडही मान्य केला आहे. लेव्हल १ च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.”
कलम २.२ हे ‘क्रिकेट उपकरणे किंवा मैदानातील साहित्याचा’चा गैरवापर केल्याप्रकरणी आहे. या गुन्ह्यात निष्काळजीपणे विकेटवर लाथ मारणे किंवा जाहिरात फलक, ड्रेसिंग रूमचे दरवाजे इत्यादींना नुकसान पोहोचवणे यांचा या कलमामध्ये समावेश आहे. पण इशानकडून नेमकी कोणती चूक झाली, ज्यामुळे हा दंड ठोठोवण्यात आला, याचा स्पष्ट उल्लेख आयपीएलने निवेदनात केलेला नाही.
गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये इशानला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. आजच्या सामन्यातही रोहित बाद झाल्यानंतर इशाननेही विकेट गमावली. इशान किशन सुरूवात चांगली करत असला तरी मोठ्या खेळीत त्याचे रूपांतर करण्यात अपयशी ठरत आहे. इशानने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात १४ चेंडूत ४ चौकारांसह २० धावा केल्या आहेत. आतापर्यंत ९ सामन्यांत इशानने २१२ धावा केल्या आहेत.