GT vs DC Match Ishant Sharma Fight with Ashutosh Sharma Video: गुजरातच्या संघाने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या विजायसह गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात दिल्लीचा मिचेल स्टार्क अपयशी ठरला तर गुजरातच्या जोस बटलरने वादळी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. पण दरम्यान या सामन्यात आशुतोष शर्मा आणि इशांत शर्मा यांच्यात वाद पाहायला मिळाला. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सर्वच खेळाडू गरमीमुळे त्रासले होते. इशांत शर्माला गरमीमुळे फार त्रास झालेला दिसला. गरमीमुळे धापा टाकत अक्षरश: इशांत शर्मा मैदानाबाहेर बसलेला दिसला. तर अक्षर पटेल आणि पंचही गरमीमुळे वैतागलेले दिसले. पण यादरम्यान इशांत शर्मा पुन्हा एक षटक टाकण्यासाठी मैदानावर आला आणि त्याने चांगली गोलंदाजी केली.
दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि त्यांच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज आशुतोष शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने शेवटच्या षटकात तुफानी खेळी केली. पण यादरम्यान, इशांत शर्माच्या एका चेंडूवर असं काहीतरी घडलं, ज्यामुळे गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज संतापला.
दिल्लीच्या डावाच्या १९ व्या षटकात ही घटना घडली. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशांतने फलंदाज डोवोवन फरेराला बाद केलं. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आशुतोष शर्माविरुद्ध झेल घेण्यासाठी अपील करण्यात आले, पण पंचांनी त्यांना नाबाद घोषित केले. गुजरातकडे रिव्ह्यू नसल्याने डीआरएस घेता आला नाही. त्यामुळे इशांतला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो थेट आशुतोषकडे गेला आणि त्याच्याकडे बोट दाखवत रागाने काहीतरी बोलताना दिसला. दरम्यान इशांत शर्मा त्याला शिव्या घालतानाही दिसत होता, पण नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं हे समोर आलं नाही.
इशांत शर्मा त्याच्यावर संतापत असताना आशुतोषने आपला संयम गमावला नाही आणि वरिष्ठ खेळाडूचा आदर करत शांत राहिला. खरंतर आशुतोष शर्माच्या खांद्याला चेंडू लागून उडाला होता. त्यामुळे आशुतोष शर्मा इशांतला दाखवत राहिला की चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही तर त्याच्या खांद्याला लागला आणि तो यष्टीरक्षकाकडे गेला. हा वाद फार काळ चालला नाही आणि गरमीमुळे वैतागलेला इशांत शर्मा मैदानाबाहेर गेला.
यानंतर, रिप्लेमध्येही स्पष्ट झालं की आशुतोष खरं बोलत होता आणि चेंडू त्याच्या खांद्यावर लागला होता. यानंतर, २० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर आशुतोष बाद झाला, पण तोपर्यंत त्याने १९ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या आणि संघाला २०० धावांच्या जवळ नेले होते.
© IE Online Media Services (P) Ltd