Ambati Rayudu taunts on Virat Kohli Orange Cap : आयपीएल २०२४ ची ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या नावावर राहिली. विराट कोहलीने या हंमाच्या सुरुवातीपासून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी होता आणि शेवटपर्यंत एकही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही. मात्र यावेळीही तो आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत नेऊ शकला नाही. आता केकेआरने सनरायझर्स हैदराबादवर मात तिसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर माजी खेळाडू अंबाती रायुडूने विराटच्या ऑरेंज कॅपबाबत असेच आणखी एक विधान केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. या हंगामात अंबाती रायडूच्या वक्तव्यांमुळे आरसीबीचे चाहते आणि त्याच्यात तणाव निर्माण झाला आहे.
ऑरेंज कॅपबाबत अंबाती रायडूचे मोठे वक्तव्य –
आयपीएल २०२४ च्या फायनलनंतर अंबाती रायुडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचे कौतुक केले. या दरम्यान त्याने ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या विराट कोहलीला टोमणा मारला. अंबाती रायुडू म्हणाला की, “ऑरेंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकली जात नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाचे सहकार्य आवश्यक आहे. केकेआरमध्ये मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या सर्वांनी योगदान दिले आहे, हे आपण पाहू शकतो. त्यानंतर केकेआर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंना थोडेफार योगदान द्यावे लागते. एक ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू कोणतीही ट्रॉफी जिंकत नाही.” अंबाती रायडूच्या या विधानानंतर आरसीबीचे चाहते पुन्हा एकदा संतापले आहेत.
आयपीएल २०२४ मधील विराट कोहलीची कामगिरी –
विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल हंगामात १५ सामने खेळले. या काळात विराटने ६१.७५ च्या सरासरीने ७४१ धावा केल्या. या हंगामात त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतके आणि १ शतक झळकले. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीने १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यात ६२ चौकार आणि ३८ षटकारांचा समावेश होता. या मोसमात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्यांमध्ये विराट कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्याचा संघ प्लेऑफ्समध्येही पोहोचला होता, पण एलिमिनेटर सामना गमावून या मोसमातून बाहेर पडला होता.
हेही वाचा – KKR तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरल्यानंतर खेळाडूंसह गौतम गंभीर-शाहरुख खानच्या आनंदाला उधाण, VIDEO व्हायरल
रायुडूने चेन्नई आणि मुंबईसाठी पटकावले विजेतेपद –
अंबाती रायुडू हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही फ्रँचायझींकडून खेळला आहे. त्याने दोन्ही संघांसाठी विजेतेपद पटकावली आहेत. रायडूने २०१३, २०१५, २०१७ मध्ये मुंबईसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर त्याने चेन्नईसाठी २०१८, २०२१, २०२३ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने १७५ आयपीएल सामन्यांमध्ये ३९१६ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा – IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
केकेआरने १० वर्षांनी तिसऱ्यांदा कोरले ट्रॉफीवर नाव –
आयपीएल २०२४ फायनल सामन्यात कोलकाताने हैदराबादवर मात करत १० वर्षांनी तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना जिंकला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने याआधी २०१४ च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता १० वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.