मुंबई विरूद्ध आरसीबीचा सामना म्हणजे विराट कोहली आणि बुमराहमध्ये द्वंद्व पाहायला मिळतं. आजच्या सामन्यात बुमराहने बाजी मारत विराट कोहलीला पाचव्यांदा बाद केले आहे. गेल्या सामन्यातील शतकवीर विराट यावेळी अवघ्या नऊ चेंडूत ३ धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला मोठी सुरुवात देण्याची जबाबदारी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांच्या खांद्यावर होती. दोन षटकात केवळ १४ धावा करत सलामीवीरांची जोडी मैदानात होती. मुंबईकडून मोहम्मद नबी आणि गेराल्ड कोएत्झीनंतर जसप्रीत बुमराहकडे तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी आली आणि बुमराहने नेहमीप्रमाणेच आपली कामगिरी चोख बजावली. फक्त कामगिरीच पूर्ण केली नाही तर विस्फोटक फलंदाज कोहलीला बाद करत मोठी विकेट मिळवून दिली.

विराट कोहली बुमराहचे पहिले षटक खेळण्यासाठी सज्ज होता. त्याने पहिला चेंडू शॉर्ट टाकला, जो डॉट होता. दुसरा चेंडू इनस्विंग होऊन गुडघ्याच्या वरील पॅडला लागला, एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील फेटाळले गेले. त्यानंतर बुमराहने तिसऱ्या चेंडूवर विराट मोठा फटका खेळायला गेला. चेंडू बॅटची कड घेत विकेटच्या मागे गेला आणि इशानने हवेत झेप घेत एक शानदार झेल टिपला.

आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटच्या या दोन सुपरस्टार्समध्ये नेहमीच रोमांचक लढत पाहायला मिळते. बुमराहची आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिली विकेट हा विराटच होता तर त्याची १५० आयपीएल विकेटही त्याने विराटला बाद करतच मिळवली होती. विराटने आतापर्यंत बुमराहच्या ९५ चेंडूंवर १४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १५ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. तर बुमराहनेही त्याला पाच वेळा बाद केले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah dismisses virat kohli for the 5th time in ipl history bdg