Jasprit Bumrah Record In T20 Cricket: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा घरात घुसून पराभव केला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या सनरायजर्स हैदराबादला २० षटकांच्या अखेरीस १४३ धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी १४४ धावा करायच्या होत्या. हे आव्हान मुंबईच्या पलटणीनं सहज पूर्ण केलं. यादरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, त्यानंतर तो दुखापतीतून सावरला आणि त्यानं दमदार कमबॅक केलं. कमबॅक करताच त्यानं एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जसप्रीत बुमराहनं टी-२० क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. बुमराह सर्वांत जलद ३०० गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या बुमराहनं हा पराक्रम २३८ व्या सामन्यात करून दाखवला आहे. त्यानं हेन्रिक क्लासेनला बाद करताना ३०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. बुमराहचे वेगवान गतीने येणारे यॉर्कर्स आणि बाऊन्सर चेंडू खेळून काढणं साधं सोपं काम नाही. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा तेव्हा तो विकेट मिळवून देत असतो. मुंबईला अनेकदा पराभवातून बाहेर काढण्यात जसप्रीत बुमराहनं मोलाची भूमिका बजावली आहे.

यासह बुमराहनं आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याच्या रेकॉर्डमध्ये लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड लसिथ मलिंगाच्या नावावर होता. मलिंगानं आपल्या आयपीएल कारकि‍र्दीत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना १७० गडी बाद केले होते. तर जसप्रीत बुमराहनं आता या रेकॉर्डमध्ये मलिंगाची बरोबरी केली आहे. पुढील सामन्यात तो मलिंगाला मागे सोडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज बनू शकतो.

मुंबईचा एकतर्फी विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना घरच्या मैदानावर खेळताना साजेशी कामगिरी करता आली नाही. संघातील अव्वल चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. शेवटी हेन्रिक क्सासेनने अर्धशतकी खेळी करून संघाची धावसंख्या १४३ धावांपर्यंत पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने तुफानी अर्धशतक झळकवलं आणि संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला.