MI vs LSG, Jasprit Bumrah Son Cute Reaction: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मुंबईने विजयाची परंपरा कायम राखत शानदार विजयाची नोंद केली आहे. मुंबईने या सामन्यात २१५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊला १६१ धावा करता आल्या. स्पर्धेतील सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात सूर्यकुमार यादव आणि रायन रिकल्टन यांनी तुफान फटकेबाजी केली. तर दुसऱ्या डावात धावांचा बचाव करताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. बुमराहने होम ग्राउंडवर गोलंदाजी करताना ४ फलंदाजांचा माघारी धाडलं.

या डावात गोलंदाजी करताना बुमराहने आधी एडन मार्करमला बाद करत लखनऊला मोठा धक्का दिला. त्यानंतर १६ व्या षटकात बुमराह पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि याच सामन्यात बुमराहने सामना फिरवला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर शेवटच्या २ चेंडूंवर बुमराहने भेदक यॉर्कर टाकले. पाचव्या चेंडूवर अब्दुल समदची दांडी गुल केली, तर शेवटच्या चेंडूवर आवेश खानची दांडी गुल केली.

ज्युनियर बुमराहची रिॲक्शन व्हायरल

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेला हा सामना पाहण्यासाठी पत्नी संजना गणेशन आणि ज्युनियर बुमराहने देखील हजेरी लावली होती. ज्यावेळी बुमराहने एकाच षटकात ३ विकेट्स घेतल्या त्यावेळी कॅमेरामनने अंगद बुमराहकडे कॅमेरा फिरवला. त्यावेळी अंगद बुमराह आणि संजना गणेशनची क्यूट रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. आपल्या वडिलांना गोलंदाजी करताना पाहून ज्युनियर बुमराह टाळ्या वाजवताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई लखनऊ सुपर जायंट्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रायन रिकल्टनने ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ५४ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर मुंबईने २० षटकअखेर ७ गडी बाद २१५ धावांचा डोंगर उभारला. लखनऊला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संपूर्ण डाव अवघ्या १६१ धावांवर आटोपला. हा सामना मुंबईने ५४ धावांनी आपल्या नावावर केला.