IPL 2025 Jasprit Bumrah Video Before MI vs KKR Clash: गेल्या वर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२५ मध्येही चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिला सामना चेन्नईविरूद्ध तर दुसऱ्या सामन्यात गुजरातविरूद्ध मुंबईला पराभव पत्करावा लागला. जसप्रीत बुमराहसारखा मोठा गोलंदाज दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. मात्र, आता एक व्हिडिओ समोर आला आहे जो केवळ मुंबई इंडियन्सला दिलासा देणार नाही तर भारतीय चाहत्यांनाही आनंदित करेल.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. महेला जयवर्धने म्हणाले, ‘बुमराह रिकव्हर होत आहे, परंतु तो कधी पुनरागमन याबद्दल काही विशिष्ट वेळ सांगता येणार नाहीये. आतापर्यंत सर्व काही ठीक आहे, परंतु NCA ने कोणतीही टाइमलाइन दिलेली नाही, म्हणून आम्ही त्याची प्रतीक्षा करू.
१२ सेकंदाचा हा जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ आहे, जो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. बुमराह डिसेंबर २०२४ मध्ये ला दुखापत झाली होती, या दुखापतीनंतर तो एनसीएमध्ये फिटनेस परत मिळवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजी करताना दिसत आहे. तो पूर्ण रनअपसह गोलंदाजी करताना दिसला आणि नंतर त्याने सेलिब्रेशनही केलं. सध्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेत जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात तो गोलंदाजीला उतरू शकला नाही. बुमराह दुखापतीमुळे इंग्लंड मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर झाला होता. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पर्यंत बुमराह फिट होईल अशी अपेक्षा होती आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने नंतर त्याचा समावेश न करण्याचा निर्णय घेत त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान दिले.
आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. २००७ नंतर इंग्लंडमध्ये भारताला पहिल्यांदाच कसोटी मालिकेत विजयी मिळवण्यासाठी बुमराहची भूमिका महत्त्वाची असणार आहे. दुखापतीपूर्वी, बुमराहने २०२४ मध्ये एक लक्षवेधक कामगिरी केली, कारण त्याने आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताला विजय मिळवून दिला होता आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये ३२ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. या कामगिरीसाठी त्याला प्रतिष्ठित आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.