प्राणघातक हल्ल्यातून सावरल्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर आता स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो, परंतु यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकणार असल्यामुळे तो निराश आहे. गेल्या आठवडय़ात गुरुवारी पहाटे २८ वर्षीय रायडरवर ख्राइश्चर्चमधील एका बारबाहेर हल्ला झाल्यानंतर त्याच्या डोक्याच्या कवटीला आणि फुप्फुसाला जबर दुखापत झाली होती. अत्यंत चिंताजनक स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी तो कोमातून बाहेर आला आणि रविवारी त्याला अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले. रायडर आता हॉस्पिटलमधील आपल्या खोलीत चालतोदेखील, अशी माहिती त्याचे व्यवस्थापक आरोन क्ली यांनी दिली.
क्ली म्हणाले, ‘‘रायडरला आयपीएलची अतिशय उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर परतण्याची आणि उत्तम कामगिरी बजावण्याची ती चांगली संधी होती.’’