Jitesh Sharma Punjab Kings New Captain : आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्ज संघाला शेवटच्या लीग सामन्यापूर्वी नवा कर्णधार मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात सॅम करन कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही. त्याच्या जागी जितेश शर्माकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे पंजाबला यंदाच्या हंगामात तिसरा कर्णधार मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला शिखर धवन कर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर सॅम करनने संघाची धुरा सांभाळली होता. आता विदर्भातील अमरावातीचा जितेश शर्मा शेवटच्या साखळी सामन्यात कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
जितेश शर्माला मिळाली पंजाब किंग्ज संघाची जबाबदारी –
सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे दोन्गी संघ १९ मे रोजी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने जितेश शर्माला कर्णधार नियुक्त केले आहे. ३० वर्षीय जितेश शर्मा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचे १३ सामन्यांत १० गुण झाले असून गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
सॅम करन मायदेशी परतला –
यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यानंतर शिखर धवनला दुखापत झाली. यानंतर शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाचा कार्यवाहक कर्णधार म्हणून सॅम करनची नियुक्ती केली. आता सॅम आंतरराष्ट्रीय कर्तव्यासाठी इंग्लंडला परतला आहे. कारण तो आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून खेळताना दिसणार आहे. इंग्लिश संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक खेळणार आहे. या संघाचा भाग असलेले आणि आयपीएल खेळणारे इंग्लंडचे अनेक खेळाडूही इंग्लंडला परतले आहेत.
हेही वाचा – IPL 2024 : विराट कोहलीचे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘रोहितला जे वाटते…’
कोण आहे जितेश शर्मा?
भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जितेश शर्मा हा उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो. जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत प्रथमच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. जितेश शर्मा चा जन्म २२ नोव्हेंबर १९९३ रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहन शर्मा एका खाजगी कंपनीत काम करतात आणि आई आशिम शर्मा गृहिणी आहेत. जितेश शर्माला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव कर्णेश शर्मा आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि त्याने लहान वयातच व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
हेही वाचा – IPL 2024 : BCCI ची हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई! पुढील हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळण्यावर घातली बंदी
जितेश शर्माची कामगिरी –
आयपीएल २०२४ मधील जितेशच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. त्याने १३ सामन्यात १४.०९ च्या सरासरीने आणि १२२.०५ च्या स्ट्राईक रेटने केवळ १५५ धावा केल्या आहेत. गेल्या आयपीएल हंगामात त्याने आपल्या चमकदार कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरच त्याला भारतीय टी-२० संघात स्थान मिळाले. आयपीएल २०२३ मध्ये, जितेशने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १४ सामन्यात ३०९ धावा केल्या होत्या. जितेशने भारतासाठी ९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो १०० धावा करण्यात यशस्वी ठरला आहे.