Jofra Archer joins IPL 2025 mega auction: आयपीएल २०२५ चा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन दिवस चालणारा हा मेगा लिलाव यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयोजित करण्यात आला आहे, ज्यासाठी १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यानंतर मेगा लिलावासाठी एकूण ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. जेव्हा हे खेळाडू शॉर्टलिस्ट गेले होते, तेव्हा त्यात जोफ्रा आर्चरचे नाव नाही हे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. पण, आता त्याच क्रिकेट चाहत्यांना पुन्हा धक्का बसण्याची वेळ आली आहे. कारण, आर्चर आयपीएल २०२५ च्या लिलावात सहभागी झाला आहे. मात्र, याबाबत आयपीएल किंवा बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
जोफ्रा आर्चरला ईसीबीची मिळाली एनओसी –
पहिल्यांदा शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये जोफ्रा आर्चरचे नाव नसताना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी भारताविरुद्ध होणारी कसोटी मालिका आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धा लक्षात घेऊन आर्चरचे नाव मागे घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, याबाबत ईसीबी आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आर्चरला शॉर्टलिस्टेड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी ईसीबीने एनओसी दिली आहे.
आर्चरचा पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी केंद्रीय करार आहे, त्यामुळे तो त्याच्या कामाचा ताण लक्षात घेऊन निर्णय घेत आहे. आर्चरने शेवटचा कसोटी सामना २०२१ मध्ये खेळला होता, त्यानंतर तो आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करू शकला नाही. ईसीबीला आशा आहे की तो पुढील वर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ॲशेस मालिकेत संघासाठी खेळताना दिसेल.
आर्चर गेल्या वेळी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता –
आता प्रश्न असा आहे की जर जोफ्रा आर्चर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात त्याची मूळ किंमत किती असेल? आर्चरच्या लिलावात त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये असू शकते. मागील आयपीएल लिलावातही आर्चरची मूळ किंमत सारखीच होती. जोफ्रा आर्चरबद्दल सांगायचे तर, मुंबई इंडियन्सने त्याला २०२२ मध्ये झालेल्या मेगा लिलावात ८ कोटी रुपयांना त्यांच्या संघाचा भाग बनवले होते, परंतु कोपराच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. यानंतर, २०२३ मध्ये आर्चर केवळ ५ सामने खेळू शकला आणि कोपरच्या दुखापतीच्या समस्येमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. आर्चर २०२० मध्ये यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता आणि त्याने त्यात २० विकेट्स घेतल्या होत्या. आर्चरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४० सामन्यांत ४८ विकेट घेतल्या आहेत.