IPL 2025 PBKS vs RR Jofra Archer Sleeping: राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या वेगाच्या जोरावर वादळी कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयपीएल २०२५ मधील पहिल्याच सामन्यात ७५ धावा दिल्यानंतर आर्चरने दणक्यात पुनरागमन करत राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरत आहे. अगदी झोपेतून उठून आर्चरने पहिल्याच षटकात दोन मोठे विकेट घेत सामना राजस्थानच्या बाजूने वळवला. होय, राजस्थानची फलंदाजी सुरू असताना आर्चर झोपला होता.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेव्हा राजस्थान संघाची फलंदाजी सुरू होती. तेव्हा आर्चर मात्र ड्रेसिंग रूममध्ये चादर घेऊन साखर झोपेत होता. आरामात झोपलेल्या आर्चरने गोलंदाजी करण्यासाठी बाहेर येताच पहिल्याच चेंडूवर थेट त्रिफळा उडवला. आर्चर झोपलेला असतानाचा व्हीडिओ आणि फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २०५ धावा केल्या. एकीकडे राजस्थानचे फलंदाज संघाला २०० धावांच्या पुढे नेण्यासाठी मोठे फटके मारण्यात व्यस्त होते. तिथे आर्चर ड्रेसिंग रूममध्ये निवांत झोपलेला दिसला. सामन्यादरम्यान झोपलेला आर्चर कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
झोपून उठल्यानंतर आर्चरने पहिल्याच षटकात आपली छाप पाडली. आर्चरला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण गोलंदाजीला येताच त्याने पहिल्याच चेंडूवर कहर केला. पंजाबच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या या सुपरफास्ट वेगवान गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्यचा त्रिफळा उडवला. आर्चरच्या चेंडूवर बचाव करताना प्रियांश आर्य क्लीन बोल्ड झाला.
जोफ्रा इथेच थांबला नाही आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या पंजाबच्या कर्णधाराला त्याच षटकात त्याने माघारी धाडालं. श्रेयस क्रीझवर येताच त्याने पहिल्याच चेंडूवर आक्रमक फलंदाजी करत शानदार चौकार मारला. यानंतर अय्यरने आणखी एक चौकार मारला पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आर्चरने पुन्हा आपली जादू दाखवत अय्यरला क्लीन बोल्ड केलं आणि पहिल्याच षटकातच पंजाबला दोन मोठे धक्के दिले. आर्चरच्या या कामगिरीने पंजाबला बॅकफूटवर ढकलले.
सामना सुरू असताना झोपणारा आर्चर हा पहिला खेळाडू नव्हता. आज झालेल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हेच चित्र दिसलं. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील या सामन्यापूर्वी शनिवारीच चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान संघाचा युवा खेळाडू वंश बेदी डगआउटमध्ये झोपलेला दिसला. तर रवींद्र जडेजासारखा वरिष्ठ खेळाडूही त्याच्या शेजारी उपस्थित होता. या सामन्यासाठी वंश प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी त्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला.