Sachin Tendulkar and Jonty Rhodes Video Clip Viral : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादविवादामुळं संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडूंनी एकमेकांचा आदर सन्मान न ठेवल्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंनी कसं वागलं पाहिजे, यावरही माजी खेळाडूंकडून टीप्पणी केली जात आहे. अशातच आता इंटरनेटवर सचिन तेंडुलकर आणि जॉंटी ऱ्होड्स यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या व्हिडीओनं तमाम चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
एका सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंचं हस्तांदोलन सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॉंटी ऱ्होड्स सचिनचे पाय धरताना या व्हिडीओत दिसत आहे. त्याचदरम्यान सचिन जॉंटीचा हात पकडून गळाभेट देतो. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून विराट-गंभीरने या अनुभवी खेळाडूंकडून चांगल्या गोष्टी शिकाव्या, असा सल्ला चाहत्यांनी दिला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
एकीकडे क्रिकेटच्या मैदानात खेळाडू एकमेकांना सन्मान देत नसल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे जॉंटी आणि सचिनच्या या व्हिडीओनं स्पीरिट ऑफ गेमचं उत्तम उदाहरण दिलं आहे. जेव्हा जॉंटी ऱ्होड्स क्रिकेट खेळत होता, त्यावेळी मैदानावर सचिनच्याविरोधात खेळाची रणनिती आखायचा. पण मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचा खूप आदर करायचे. परंतु, कोहली, गंभीर आणि नवीन उल हकने खेळाचं रुपडंच बदलून टाकलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही दोन्ही खेळाडूंवर सडकून टीका केली होती. दोघांनाही कठोर शिक्षा दिली पाहिजे, असं गावसकर यांनी म्हटलं होतं. अशातच आता माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने दोघांवरही बंदी घालण्याबाबत म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना सेहवागने दोघांनाही फटकारलं आहे. माझी मुलंही सामना पाहतात आणि ‘बेन स्टोक्स’चा अर्थ त्यांना समजतो, अशा शब्दात सेहवागने प्रतिक्रिया दिली .