दमदार सांघिक खेळाच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दणदणीत विजय साकारला. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बंगळुरूला १६९ धावातच रोखलं. छोट्या स्टेडियमवर जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी मॅरेथॉन भागीदारी साकारत विजयाचा पाया रचला. सुदर्शनचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. पण बटलरने मनमुराद फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.
अर्शद खानने विराट कोहलीला बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. फिल सॉल्टला जोस बटलरने जीवदान दिलं पण तो याचा फायदा उठवू शकला नाही. त्याने १४ धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला बाद केलं. सिराजनेच देवदत्त पड्डीकलला माघारी धाडलं. पॉवरप्लेच्या षटकांचा बंगळुरू फायदा उठवू शकलं नाही. रजत पाटीदार स्थिरावलाय असं वाटत असतानाच इशांत शर्माने त्याला बाद केलं. यानंतर लायम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी सहाव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. साईकिशोरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा जितेशचा प्रयत्न फसला. त्याने २१ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. जितेशच्या जागी आलेल्या टीम डेव्हिडने लिव्हिंगस्टोनला चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोनने ४० चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. टीम डेव्हिडने १८ चेंडूत ३२ धावा केल्या. या तिघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बंगळुरूने १६९ धावांची मजल मारली. मोहम्मद सिराजने ३ तर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिल झटपट बाद झाला. पण यानंतर साई सुदर्शन-जोस बटलर जोडीने दुसर्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७५ धावांची भागीदारी करत बंगळुरूच्या गोलंदाजांना निरुत्तर केलं. हेझलवूडने सुदर्शनला बाद केलं. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने सामन्याची सूत्रं हाती घेतली. शेरफन रुदरफोर्डने त्याला चांगली साथ देत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बटलरने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. रुदरफोर्डने १८ चेंडूत ३० धावांची खेळी करत बटलरला चांगली साथ दिली.