Kavya Maran hugging Kane Williamson Video Viral : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२४ मधील ६६वा सामना गुरुवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सततच्या पावसामुळे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. सामना सुरू होण्याची नियोजित वेळ संध्याकाळी ७.३० होती, मात्र अखेर पंचांनी रात्री १०:१० वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केन विल्यम्सन आणि काव्या मारन यांनी एकमेकांची भेट घेतली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सामना रद्द झाल्यानंतर कान्याने विल्यम्सनची भेट –
पावसामुळे सामना रद्ध झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनने एसआरएचचा माजी कर्णधार केन विल्यमसनची गळाभेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केन विल्यमसन सध्या गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. केन विल्यमसन २०१५ ते २०२२ पर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. केन विल्यमसनने सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्वही केले आहे.
सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफ्समध्ये केला प्रवेश –
प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या गुजरात टायटन्सचा हा सलग दुसरा सामना आहे, जो पावसामुळे रद्द झाला. याआधी १३ मे रोजी अहमदाबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध संघाचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. सामना रद्द झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. सनरायझर्स हैदराबादचे १३ सामन्यांत १५ गुण झाले असून गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा – SRH vs GT सामना पावसामुळे रद्द; हैदराबाद प्लेऑफ्समध्ये दाखल तर दिल्ली शर्यतीतून बाहेर
एका जागेसाठी तीन संघांत शर्यत –
आता चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स हे तीन संघ प्लेऑफसाठी उरलेले एक स्थान पटकावण्यासाठी शर्यतीत आहेत. हैदराबादचे आता १३ सामन्यांतून १५ गुण आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणताही संघ १५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकत नाही. या स्थितीत सनरायझर्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. १३ सामन्यांनंतर चेन्नईचे १४ गुण आहेत. १८ मे रोजी संघाचा सामना बंगळुरूशी होणार आहे. बंगळुरू आणि लखनऊचे प्रत्येकी १२ गुण आहेत. तथापि, लखनऊचा नेट रन रेट खूपच नकारात्मक आहे आणि त्याची भरपाई करणे त्यांच्यासाठी कठीण होईल. अशा स्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना नॉकआऊट मानला जात आहे.