Ravindra Jadeja Tweet Viral : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आयपीएल २०२३ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला होता. या सामन्यात जडेजाने ७ चेंडूत २० धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीमुळं चेन्नईला २० षटकांत ३ विकेट्स गमावत २२३ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने ९ विकेट्स गमावत फक्त १४६ धावाच केल्या होत्या. त्यामुळे दिल्लीला या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आलं. जडेजाने या सामन्यात एक विकेटही घेतली. मात्र, सामना संपल्यानंतर जडेजाने ट्वीटरवर केलेल्या एक पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे.
सामना संपल्यानंतर जडेजा मैदानाच्या बाहेर जात असताना दोन वरिष्ठ खेळाडूंसोबत शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलं. त्यानंतर धोनीनं जडेजासोबत चर्चा केली. परंतु, मैदानात नेमकं काय घडलं, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसंच रविंद जडेजाने याबाबात खळबळजनक पोस्ट शेअर केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचं समोर येत आहे.
“कर्माची फळं तुला भोगावी लागतील. आता किंवा नंतर. पण नक्कीच”, अशा प्रकारचं ट्वीट जडेजानं केल्यामुळं क्रीडाविश्वात खळबळ माजली आहे. जडेजाच्या या पोस्टमुळं चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी या प्रकरणाबाबात ट्वीटरवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात जडेजाने १४ सामन्यांमध्ये १५३ धावा करत १७ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे.