Karun Nair IPL Comeback Fifty: करूण नायर हे नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून गाजत आहे. पण आता करूण नायरने आयपीएलमध्ये पुनरागमनाचा डंका वाजवला आहे. करूण नायरला दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२५ साठी आपल्या ताफ्यात सामील केलं. करूणला सुरूवातीचे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण संधी मिळताच मात्र त्याने या संधीचं सोनं केलंय. करूण नायरने २२ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं.

करूण नायरने जसप्रीत बुमराहच्या षटकात त्याची धुलाई करत अंदाधुंद फटकेबाजी केली. करूण नायरने उत्कृष्ट क्रिकेट खेळत आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केलं. बुमराहच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात त्याने दोन चौकार लगावले. तर त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात करूण नायरने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. या षटकात त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत २२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

बुमराहच्या षटकात वादळी फटकेबाजी केल्यानंतर करूण नायरने कोणत्याच गोलंदाजाला सोडलं नाही. पण अखेरीस मिचेल सँटनरने एक उत्कृष्ट चेंडू टाकत त्याला ८९ धावांवर क्लीन बोल्ड केलं. करूण नायर ४० चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह ८९ धावा करत बाद झाला. पण संघाच्या विजयाच्या आशा मात्र पल्लवित करत माघारी परतला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दशकभर कर्नाटकसाठी खेळल्यानंतर संघातून बाजूला केलं जातंय हे करुणच्या लक्षात आलं. त्यानंतर तो विदर्भ संघात सामील झाला. विदर्भचा पोट्टा झाल्यापासून करुण नायरला अक्षरक्ष: वेड लागलंय. त्याने धावांची फॅक्टरीच उघडलेय. भारतीय संघाचा दरवाजा किलकिला नव्हे तोडल्याशिवाय भाई ऐकत नाही अशी स्थिती. विजय हजारे चषक स्पर्धेत करुणने ९ सामन्यात ७७९ धावा चोपल्या. सरासरी भरली ३८९.५० अशी अबब. स्ट्राईकरेट म्हणजे तुडवण्याचा दर १२४.०४ एवढा तगडा. प्रतिस्पर्ध्यांची खांडोळी करताना नावावर ५ शतकं. करुणच्या या अविश्वसनीय आकडेवारीच्या बळावर विदर्भने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत करुणचं माहेर कर्नाटकनेच विदर्भला नमवलं पण करुणच्या तडाखेबंद खेळाने अनेक विक्रम मोडीत निघाले, नवे प्रस्थापित झाले. वनडेत ताकद दाखवून झाल्यावर सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतही करुणची बॅट तळपली. ६ डावात २५५ धावा. ४२ची सरासरी आणि १७७.०८चा स्ट्राईक रेट. पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करावी लागणाऱ्या फॉरमॅटमध्येही करुणचाच जोर. यात तीन अर्धशतकं.