मुंबई इंडियन्सचं प्रमुख अस्त्र असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला. यानिमित्ताने संघव्यवस्थापनाने त्याचं दणक्यात स्वागत केलं. मुंबईची पुढची लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. या लढतीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ असं काहीसं समीकरण झालं होतं. पण सलग गोलंदाजीचा परिणाम पाहायला मिळाला. बुमराहचं पाठीचं दुखणं बळावलं. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळू शकला नाही. आयपीएल स्पर्धेतही तो नेमका कधी खेळू शकेल याविषयी साशंकता होती. बंगळुरूतल्या एनसीएमध्ये प्रदीर्घ रिहॅब प्रक्रिया पूर्ण करून बुमराह मुंबईत परतला आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हीडिओत संपूर्ण संघाने बुमराहचे भरभरून स्वागत केले. यावेळी संघाचा फलंदाजी प्रशिक्षक कायरेन पोलार्डने बुमराहचं स्वागत केलं आणि चक्क त्याला उचलून घेतलं. ‘वेलकम मुफासा’ अशा शब्दात पोलार्डने बुमराहचं स्वागत केलं. ‘द लायन किंग’ या अॅनिमेशन चित्रपटात मुफासा हा सिंह जंगलाचा प्रमुख असतो. त्या धर्तीवर बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा आधारवड आहे. त्यामुळे पोलार्डने बुमराहचा उल्लेख मुफासा असा केला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट केला.

बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईने चार सामने खेळले असून त्यापैकी तीन गमावले आहेत. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर यांना लय गवसलेली नाही. अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथ्थूर या युवा शिलेदारांनी चमकदार पदार्पण केलं आहे. पण मुंबईला बुमराहची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते आहे. बुमराहचा अंतिम अकरात समावेश झाल्यानंतर मुंबईच्या संघाला बळकटी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी बुमराहसंदर्भात अपडेट दिली होती. बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. अचूकता आणि विकेट्स पटकावण्यातलं सातत्य अचंबित करणारं आहे. तो लवकरच संघात परतेल असा विश्वास जयवर्धने यांनी व्यक्त केला होता.

माजी कर्णधार रोहित शर्माही बंगळुरूविरुद्धच्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित लखनौविरुद्ध खेळू शकला नव्हता.