* पंजाबचा कोलकात्यावर ४ धावांनी विजय
* सुनील नरिनची हॅट्ट्रिक व्यर्थ
प्रतिस्पर्धी गोलंदाजाने ‘हॅट्ट्रिक’ साकारली असली तरी विजयाची ‘ट्रिक’ आमच्याकडे असल्याचे अटीतटीच्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने दाखवून दिले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सवर ४ धावांनी विजय साकारला आणि प्रीतीची प्रीत अखेर खुलली. सुनील नरिनची हॅट्ट्रिक आणि जॅक कॅलिसच्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकात्याने पंजाबला १५७ धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरादाखल कोलकात्याचा संघ १५३ धावाच करू शकला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनप्रीत गोनीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पंजाबच्या १५८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची दुसऱ्या षटकात २ बाद १ अशी अवस्था झाली होती. परंतु कर्णधार गौतम गंभीर आणि ईऑन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. गंभीरने अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करत ३९ चेंडूंत ९ चौकारांसह ६० धावांची खेळी साकारली. १४व्या षटकांत गोनीने त्याचा काटा काढल्यावर पुढच्याच षटकात मॉर्गनही तंबूत परतला. मॉर्गनने बाद होण्यापूर्वी ६ चौकारांसह ४७ धावांची खेळी साकारली. गंभीरला बाद केल्यावर गोनीने ११ चेंडूंत फक्त २ वाइडच्या रूपात धावा देत कोलकाताच्या धावसंख्येला खीळ घातली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला सलामीवीर मनदीप सिंगने ६ चौकारांसह ४१ धावांची खेळी साकारत संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. कॅलिसने ११ व्या षटकात मनदीपचा काटा काढला. त्यानंतर १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नरीनने स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या डेव्हिड हसीचा (१२) काटा काढला, त्यानंतरच्या चेंडूवर अझर मेहमूदला (०) चकवा देत झेल पकडला आणि सहावा ‘कॅरम बॉल’ टाकत त्याने गुरुकीरत सिंगचा (०) त्रिफळा उद्ध्वस्त करत हंगामातील पहिली हॅट्ट्रिक मिळवली. नरिनने तिहेरी धक्के दिल्यामुळे पंजाबची १५व्या षटकात ६ बाद ९९ अशी अवस्था होती. यामधून त्यांना मनप्रीत गोनीने बाहेर काढले. मनप्रीतने १८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ४२ धावांची खेळी साकारत संघाला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद १५७ (मनप्रीत गोनी, मनदीप सिंग ४१; जॅक कॅलिस ३/२४, सुनील नरीन ३/३३) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ९ बाद १५३ (गौतम गंभीर ६०, इऑन मॉर्गन ४७; अझर मेहमूद ३/२१). सामनावीर : मनप्रीत गोनी.
नरीनने साकारली हंगामातली पहिली हॅट्ट्रिक
मोहाली : आयपीएलच्या सहाव्या हंगामाचा कैफ थोडाफार चढत असताना कोलकाता नाइट रायडर्सच्या सुनील नरीनने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक काढत सर्वानाच आपली दखल घ्यायला लावली. आतापर्यंतच्या आयपीएलमधील ही पहिली हॅट्ट्रिक आहे. पंधराव्या षटकात नरीनने डेव्हिड हसी, अझर मेहमूद आणि गुरकीरत सिंग यांना बाद करत यंदाच्या हंगामातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान पटकवला.
आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारे गोलंदाज
वर्ष नाव संघ
२००८ लक्ष्मीपती बालाजी चेन्नई सुपर किंग्ज
२००८ अमित मिश्रा दिल्ली डेअरडेव्हिल्स
२००८ मखाया एन्टिनी चेन्नई सुपर किंग्ज
२००९ युवराज सिंग किंग्ज इलेव्हन पंजाब
२००९ रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स
२०१० प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०११ अमित मिश्रा डेक्कन चार्जर्स
२०१२ अजित चांडिल्य राजस्थान रॉयल्स
२०१३ सुनील नरीन कोलकाता नाइट रायडर्स
आरोन फिन्च, पुणे वॉरियर्सचा खेळाडू
पुणे वॉरियर्सचा संस्मरणीय विजय!!! स्टीव्हन स्मिथ, भुवनेश्वर कुमार आणि राहुल शर्माचे शानदार प्रदर्शन.. दोनच दिवसांत सनरायझर्स हैदराबादशी दोन हात करण्यास तय्यार..!
पंजाबचे बल्ले-बल्ले!
* पंजाबचा कोलकात्यावर ४ धावांनी विजय * सुनील नरिनची हॅट्ट्रिक व्यर्थ प्रतिस्पर्धी गोलंदाजाने ‘हॅट्ट्रिक’ साकारली असली तरी विजयाची ‘ट्रिक’ आमच्याकडे असल्याचे अटीतटीच्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने दाखवून दिले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सवर ४ धावांनी विजय साकारला आणि प्रीतीची प्रीत अखेर खुलली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-04-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kings eleven punjab wins against kkr