जिंकण्यासाठी पुणे वॉरियर्सच्या १८६ धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची २ बाद ५ अशी अवस्था झाली होती. मात्र डेव्हिड मिलर आणि मनदीप सिंगने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारत पंजाबला पुण्यावर  ७ विकेट्सनी थरारक विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकांत १६ धावा करण्याचे आव्हान मिलरच्या दोन उत्तुंग षटकाराच्या जोरावर पंजाबने पेलले. मिलरने नाबाद ८० तर मनदीपने नाबाद ७७ धावांची खेळी साकारत पंजाबच्या पदरात विजयाचे दान टाकले.
पुण्याचा धावांचा डोंगर आणि त्यामध्ये चांगली सुरुवात न झाल्याने पंजाब सामना जिंकणार का, हा मोठा प्रश्न होता. पण  मिलर-मनदीप जोडीने चौथ्या विकेटसाठी १२८ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिलरने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ४१ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची खेळी साकारली, तर मनदीप सिंगने ५८ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली.
गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या संघातल्या मुकाबल्यात पुण्याने पंजाबविरुद्ध १८५ धावांचा डोंगर उभारला. अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत पुण्याचे नेतृत्व करणाऱ्या एरॉन फिन्चने ६४ धावांची खेळी करत मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. रॉबिन उथप्पा-फिन्च जोडीने ८३ धावांची खणखणीत सलामी दिली. पंजाबच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा त्यांना फायदा झाला. परविंदर अवानाने उथप्पाला (३७) बाद केले. यानंतर फिन्च-युवराज जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फिन्च मनप्रीत गोणीच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ८ चौकार आणि २ षटकारांसह ४२ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या युवराज सिंगने आपल्या घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. २४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावा करुन तो बाद झाला. यानंतर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अंतिम अकरात स्थान मिळालेल्या ल्युक राइटने संधीचे सोने केले. राइटने १० चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार लगावत ३४ धावा केल्या. राइटच्या या बेधडक खेळीमुळेच पुण्याला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडता आला. पंजाबतर्फे अझर मेहमूदने सर्वाधिक २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ४ बाद १८५ (एरॉन फिन्च ६४, रॉबिन उथप्पा ३७, ल्युक राइट ३४, अझर मेहमूद २/४२) पराभूत विरुद्ध  किंग्स इलेव्हन पंजाब : १९.५ षटकांत ३ बाद १८६ (डेव्हिड मिलर नाबाद ८०, मनदीप सिंग नाबाद ७७, युवराज सिंग १/१५)
सामनावीर : डेव्हिड मिलर