राजस्थान रॉयल्सच्या विजयी अश्वमेधाला अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने रोखले. हा अटीतटीचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि साऱ्यांनीच श्वास रोखून धरले. पंजाबने शॉन मार्शच्या तीन चौकारांच्या जोरावर १५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा खेळ अवघ्या सहा धावांमध्ये खल्लास झाला आणि पंजाबने सुपर ओव्हरमध्ये ९ धावांनी विजय मिळवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शॉन मार्श आणि डेव्हिड मिलर यांनी थरारक खेळी साकारत विजय दृष्टिक्षेपात आणला. पण हे दोघेही बाद झाल्यावर मिचेल जॉन्सन आणि अक्षर पटेल यांनी झुंजार खेळ करत विजय समीप आणला. शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना अक्षर पटेलने जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर चौकार खेचला आणि सामना बरोबरीत सुटला.
कर्णधाराच्या भूमिकेत असलेला वीरेंद्र सेहवाग (१) स्टीव्हन स्मिथच्या अचूक धावफेकीची शिकार ठरला. मुरली विजयही (२१) धावबाद झाला. झंझावाती खेळासाठी प्रसिद्ध ग्लेन मॅक्सवेल (१) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. ३ बाद ५९ अशा स्थितीतून शॉन मार्श आणि डेव्हिड मिलर जोडीने चौथ्या विकेटसाठी ६ षटकांतच ५८ धावांची वेगवान भागीदारी केली. प्रवीण तांबेने मार्शला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. मार्श बाद झाल्यानंतर मिलरने सामन्याची सूत्रे हाती घेत हल्लाबोल केला. मिलरने वृद्धिमान साहाच्या साथीने २.३ षटकांत ३५ धावा जोडल्या. मॉरिसने साहाचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. त्याने १९ धावा केल्या. मिलरने षटकारांची बरसात करत पंजाब विजयश्री खेचून आणली असे वाटत असतानाच तो हूडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३० चेंडूत एक चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांच्या शानदार सलामीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने १९१ धावांचा डोंगर उभारला. रहाणे-वॉटसन जोडीने ९५ धावांची खणखणीत सलामी दिली. वॉटसनला अक्षर पटेलने बाद केले. त्याने ३५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या दीपक हुडाने ९ चेंडूत १९ धावा फटकावल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. शतकाकडे कूच करणाऱ्या रहाणेला मिचेल जॉन्सनने बाद केले. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर करुण नायर (१३ चेंडूत २५), स्टुअर्ट बिन्नी (४ चेंडूत १२) आणि संजू सॅमसन (२ चेंडूत ५) या तिघांनी छोटय़ा पण उपयुक्त खेळी केल्या. पंजाबतर्फे अक्षर पटेलने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १९१ (अजिंक्य रहाणे ७४, शेन वॉटसन ४५, करुण नायर २५, अक्षर पटेल २/३०) बरोबरी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १९१ (शॉन मार्श ६५, डेव्हिड मिलर ५४, प्रवीण तांबे १/२०, राहुल टेवाटिया १/३१)
सामनावीर : शॉन मार्श