किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ कधी झगडताना आढळतो, तर कधी अनपेक्षितपणे विजय मिळवून दाखवतो. हे सारे पंजाबच्या अनिश्चिततेचे प्रतीक. पण गुरुवारी या किंग्ज इलेव्हन पंजाबची ‘चेपॉक चाचणी’ आहे. दोन वेळा आयपीएल विजेत्या आणि सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान पंजाबला जड जाणार आहे.
सोमवारी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या साखळी सामन्यात पंजाबने दिमाखात प्रतिकार केला. परंतु फक्त चार धावांनी त्यांच्या वाटय़ाला पराभव आला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जची घोडदौड शानदार पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंतच्या १० सामन्यांत चेन्नईने सर्वाधिक ८ विजय प्राप्त केले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल विजेतेपदासाठी त्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
सलामीवीर मायेकल हसीच्या दमदार फलंदाजीच्या बळावर चेन्नईने मागील सहा सामने जिंकण्याची करामत दाखवली आहे. मंगळवारी रात्री हसी फार धावा करू शकला नाही. पण त्याआधी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ९५ धावांची लाजवाब खेळी साकारली होती. सध्या हसीच्या खात्यावर ९ सामन्यांत ४५० धावा असून, तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅटसुद्धा तेजाने तळपते आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा अखेरच्या षटकांमध्ये करामती दाखवत आहे. त्यामुळे पंजाबच्या चिंतेत भरच पडली आहे.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो चेन्नईचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्रिनिदादचा हा खेळाडू धावांसाठी झगडत असला तरी त्याच्या खात्यावर १६ बळी जमा आहेत. चेन्नईने मंगळवारी खराब कामगिरी करणाऱ्या मुरली विजयला विश्रांती दिली आणि सलामीच्या स्थानासाठी वृद्धिमान साहाला संधी दिली होती.
गोलंदाजीच्या विभागात चेन्नईपुढे मर्यादा आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅल्बी मॉर्केलने ४ सामन्यांत फक्त १ बळी घेतला आहे. परंतु युवा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन करीत आहे. त्याने ७ सामन्यांत १४.६च्या सरासरीने ९ बळी मिळवले आहेत.
प्रतिस्पर्धी पंजाबचा संघ मात्र मुंबई इंडियन्सकडून हार पत्करून चेपॉक स्टेडियमवर डेरेदाखल झाला आहे. त्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने आपला अपयशी संघनायक अ‍ॅडम गिलख्रिस्टला विश्रांती दिली होती. धडाकेबाज फटकेबाजी करणाऱ्या या यष्टिरक्षक-फलंदाजाला ८ सामन्यांत फक्त ९४ धावा करता आल्या होत्या. परंतु फॉर्मात असलेल्या मनदीप सिंगने ९ सामन्यांत २२८ धावा केल्या आहेत. मनदीपसोबत ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्शला सलामीला उतरतो. ऑस्ट्रेलियाचा आणखी एक अनुभवी खेळाडू आणि पंजाबचा प्रभारी कप्तान डेव्हिड हसीने ९ सामन्यांत १९९ धावा केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर पंजाबने गुरुवारी अनपेक्षित विजयाची नोंद केल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.

Story img Loader