Kolkata Knight Riders won by 18 runs : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे १६-१६ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर आयपीएल २०२४ मधील हंगामात बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे आहे. या अगोदर दोन वर्ष प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळलेल्या या संघाने यंदाच्या हंगामात गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली शानदार पुनरागमन केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने ७ गडी गमावून मुंबईसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ १३९ धावांच करु शकला.
शानदार सुरुवातीनंतरही मुंबईच्या पदरी निराशा –
कोलकातान नाईट रायडर्सने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या षटकात एकही विकेट न गमावता ६२ धावा केल्या होत्या. यानंतर प्रथम किशन ७ व्या षटकात बाद झाला आणि नंतर ८ व्या षटकात रोहित देखील बाद झाला. इथून सामना कोलकाताच्या बाजूने झुकू लागला. पॉवरप्लेनंतर मुंबईला पुढील ४ षटकांत केवळ १९ धावा करता आल्या आणि २ महत्त्वाच्या विकेट्सही गमावल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या १० षटकांत २ बाद ८१ अशी झाली. शेवटच्या ६ षटकात संघाला ७७ धावांची गरज होती, पण सूर्यकुमार यादवने ११व्या षटकात ११ धावांवर आपली विकेट गमावली. पुढील २ षटकांत हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिड बाद झाल्याने मुंबई संघाच्या अडचणीत खूप वाढ झाली.
त्यानंतर मुंबईला विजयासाठी शेवटच्या ३ षटकात ५७ धावा करायच्या होत्या. नमन धीर आणि तिलक वर्मा अजूनही क्रीजवर होते. १५ व्या षटकात आंद्रे रसेलने १९ धावा दिल्याने सामना रोमांचक झाला. मुंबईला शेवटच्या ६ चेंडूत २२ धावा करायच्या होत्या. नमन धीर शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ६ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. यानंतर हर्षित राणाने ३२ धावांवर तिलक वर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्याने मुंबईच्या अडचणीत आणखी वाढ झाली. अखेर मुंबईने ८ गडी गमावून १३९ धावा केल्या. केकेआरने १८ धावांनी वि जय मिळवत प्लेऑफसाठी पात्रता मिळवणारा पहिला संघ ठरला. हर्षित राणासह आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
पावसामुळे सामना दोन तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला –
तत्पूर्वी, पावसामुळे सामना दोन तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यात गोलंदाजांनी वेळ वाया घालवला नाही. केकेआरला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही आणि संघाने १६ षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या