RR vs KKR IPL 2025 Highlights in Marathi: क्विंटन डिकॉकच्या ९७ धावांच्या प्रभावी खेळीच्या जोरावर केकेआरने राजस्थानचा पराभव करत अखेरीस गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. केकेआर संघाने डिकॉकच्या शानदार आणि प्रसंगी सावध खेळीच्या जोरावर रॉयल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर ८ विकेट्सने पराभव केला आहे. गुवाहाटीची खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती आणि जिथे धावा करणं एक मोठं आव्हान होतं. राजस्थानचा संघ या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. अथवा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. याचा फटका संघाला बसला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघ केवळ १५१ धावा करू शकला, प्रत्युत्तरात कोलकाताला लक्ष्य गाठण्यात फारशी अडचण आली नाही. कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला तो डी कॉक, ज्याने कोलकाताकडून खेळताना पहिलं अर्धशतक झळकावलं. डी कॉकने ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ९७ धावांची नाबाद खेळी खेळली, त्याचे शतक हुकले पण डी कॉकची खेळी खूप खास ठरली. कारण गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती आणि तो शेवटपर्यंत क्रीझवर राहत केकेआरला मोसमातील पहिला विजय मिळवून माघारी परतला.

गुवाहाटीच्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती आणि हे जाणून घेत पॉवरप्लेमध्ये कोलकाताने संथ सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये केकेआरला फक्त ४० धावा करता आल्या, संघाने ७.४ षटकांत ५० धावांचा टप्पा गाठला. मोईन अली आणि अजिंक्य रहाणे सहज फलंदाजी करू शकले नाहीत. पण क्विंटन डि-कॉकने प्रभावी खेळी केली. डि-कॉकने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर डि-कॉकने अंगक्रिश रघुवंशीसह ३० चेंडूत ५० धावांची भागीदारी करत केकेआरचा विजय निश्चित केला.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजीसाठी उतरला. सॅमसन आणि जैस्वाल यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र वैभव अरोराने चौथ्या षटकात विकेट घेत केकेआरला पहिले यश मिळवून दिले. सॅमसन बाद झाल्यानंतर रियान परागने वेगवान फलंदाजी केली. त्याने १६६ च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूत ३ षटकारांसह २५ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल २९ धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्तीनेही रियान परागला २५ धावांवर बाद केलं. नितीश राणालाही केवळ ८ धावा करता आल्या. हसरंगा ४ धावा करत माघारी परतला. ध्रुव जुरेलने मैदानावर टिकून राहत ३३ धावा केल्या, तर जोफ्रा आर्चरच्या षटकारांमुळे राजस्थान १५० धावांचा आकडा गाठू शकला.

क्विंटन डॉ-कॉकसह फिरकीपटू कोलकाताच्या विजयाचे हिरो ठरले. वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत केवळ १७ धावा देत २ विकेट घेतले. सुनील नरेन आजारी असल्याने त्याच्या जागी आलेल्या मोईन अलीनेही २३ धावांत २ विकेट घेतले. हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले.