IPL 2025 KKR vs SRH Highlights in marathi: कोलकाता नाईट रायडर्स संघाने ईडन गार्डन्सच्या मैदानावर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. हैदराबादला केकेआरने ८० धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला आहे. हैदराबादचा आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. इतक्या मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पहिल्यांदाच पराभूत झाला आहे. केकेआरने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ अवघ्या १२० धावांवर १६.४ षटकांत सर्वबाद झाला.

कोलकाताचा चार सामन्यांमध्ये हा दुसरा विजय आहे. तर हैदराबादने सलग तिसरा सामना गमावत पराभवाची हॅटट्रिक साधली आहे. पुन्हा एकदा केकेआरने हैदराबादच्या सलामीवीरांना माघारी धाडलं आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. हैदराबादची टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर संघ पुन्हा सावरू शकला नाही आणि परिणामी त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

केकेआरने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाची सुरूवात इतकी खराब झाली की संघ शेवटपर्यंत या धक्क्यांमधून सावरू शकला नाही. केकेआरकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या वैभव अरोराने पहिल्याच षटकात कहर केला. त्याच्या पहिल्या चेंडूवर हेडने चौकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर त्याला झेलबाद करवत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यानंतर हर्षित राणाने अभिषेक शर्माला २ धावांवर असताना झेलबाद केलं. तर इशान किशनही झेलबाद झाला.

नितीश कुमारने पुन्हा एकदा निराश केलं आणि तो १९ धावा करत बाद झाला. तर कामिंदु मेंडिस २७ धावा, हेनरिक क्लासेनने ३३ धावांची सर्वात मोठी खेळी केली पण तो संघाला शेवटपर्यंत थांबत विजयापर्यंत नेऊ शकला नाही. तर पॅट कमिन्स १४ धावा करत बाद झाला. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजीवर आळा घातला. वैभव अरोरा आणि वरूण चक्रवर्ती यांनी ३-३ विकेट घेतले. तर आंद्र रसेलने २ विकेट तर हर्षित राणा आणि सुनील नरेनने १ विकेट घेतली.

आयपीएलमध्ये सर्वात मोठा पराभव हैदराबादला कोणाविरूद्ध पत्करावा लागला?

केकेआर विरुद्ध ८० धावांनी पराभूत, कोलकाता, २०२५*
सीएसके विरुद्ध ७८ धावांनी पराभूत, चेन्नई, २०२४
सीएसके विरुद्ध ७७ धावांनी पराभूत, हैदराबाद, २०१३
आरआर विरुद्ध ७२ धावांनी पराभूत, हैदराबाद, २०२३
केएसएल, शारजाह, ७२ धावांनी पराभूत, किंग्स इलेव्हन पंजा (आताची पंजाब किंग्स), शारजाह २०१४

तत्त्पूर्वी नाणेफेक गमावत केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. केकेआरची सुरूवातही खराब झाली होती. क्विंटन डि कॉक आणि सुनील नरेन स्वस्तात बाद झाले होते. पण अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला. अंजिक्य रहाणेने २७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर अंगक्रिश रघुवंशीने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.

वेंकटेश अय्यर जो सुरूवातीच्या सामन्यांणमध्ये फेल ठरला होता त्याने या सामन्यात २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मगतीने ६० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर रिंकू सिंग १७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा करत नाबाद परतला. रिंकू आणि वेंकटेशने मिळून अखेरच्या ४ षटकांमध्ये ६६ धावा केल्या. हैदराबादकडून शमी, कमिन्स, झीशान अन्सारी, हर्षल पटेल आणि कामिंदू मेंडिस यांनी १-१ विकेट घेतली. या पराभवासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी पोहोचला.