आतापर्यंत आयपीएल २०२३ मध्ये मैदानावर खेळाडूंमध्ये फारसा तणाव नव्हता. पण, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ते पाहायला मिळाले. वेगवेगळ्या संघातून सामन्यात दाखल झालेले दिल्लीचे दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव बचावासाठी आला नसता तर काहीही होऊ शकले असते. वास्तविक, मैदानावरील हा हायव्होल्टेज वाद ऋतिक शोकीन आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा यांच्यात झाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबईचा गोलंदाज हृतिक शोकीन हे दोघेही दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतात. या दोघांमधील वाद केकेआरच्या डावाच्या ९ व्या षटकात झाला. हे षटक टाकायला हृतिक आला होता. नितीश राणा स्ट्राइकवर होता. हृतिकच्या पहिल्याच चेंडूवर नितीश राणाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटवर नीट न आल्याने हवेत गेला. रमणदीप सिंगने त्याचा सहज झेल घेतला.

राणाचा डाव १० चेंडूत संपला. नितीश लवकर बाद झाल्यामुळे उदास दिसत होता आणि केकेआर डगआउटमध्ये परतताना हृतिक शोकीनने त्याला काहीतरी सांगितले. आणि त्यावर नितीशचा राग वाढला आणि तो वेगाने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिककडे जाऊ लागला. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वरिष्ठ गोलंदाज पियुष चावला यांनी मदतीला धावून या दोघांना वेगळे केले. दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकात्याकडून फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने ५१ चेंडूत १०४ धावा करत शतक ठोकले. कोलकात्याच्या संघाने मुंबईसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले. मुंबईने ५ विकेट्सच्या बदल्यात आव्हान पार करत विजय मिळवला. मुंबईकडून इशानने २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.

हेही वाचा: IPL2023, MI vs KKR: सुर्याला सूर गवसला! मुंबई पलटणचा कोलकाता नाईट रायडर्सवर पाच गडी राखून दणदणीत विजय

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पोट दुखत असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारने नाणेफेक केली आणि जिंकली देखील. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई संघासोबत सराव करत आहे. दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर रविवारी अखेर अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.