Chandrakant Pandit Statement About Rinku Singh : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यात रिंकू सिंगने धावांचा पाऊस पाडला. शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकून रिंकूने कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये एकाच इनिंगमध्ये खास पराक्रम करून रिंकू सिंगने पाच विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे आख्खा क्रीडा विश्वात कालपासून फक्त रिंकूच्याच नावाची चर्चा रंगलीय. कोलाकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही रिंकू सिंगवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंडित यांनी रिंकूच्या अप्रतिम खेळीबाबत बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिंकूच्या पराक्रमाची चंद्रकांत पंडितांनी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि जावेद मियाँदाद यांच्या षटकारांशी तुलना केली आहे. याबाबतचा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
रिंकूच्या अप्रतिम खेळीबाबत बोलताना पंडित म्हणाले, “माझ्या ४३ वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये राष्ट्रीय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. मी याआधी दोन इनिंग पाहिल्या होत्या. रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीत मारलेले सहा षटकार आणि जावेद मियॉंदाद यांनी दुबईत शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार, अशा दोन इनिंग मी पाहिल्या आहेत. पण त्यानंतर आता मी रिंकू सिंगला अशा प्रकारची चमकदार कामगिरी करताना पाहिलं. उमेश यादवने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव काढली, मोक्याच्या क्षणी अशाप्रकारची रणनिती आखल्याचा आनंद झाला. तसंच नितीश राणा आणि व्येंकटेश अय्यर यांच्याही कामगिरीचं कौतुक केलं पाहिजे.”
इथे पाहा व्हिडीओ
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महामुकाबला झाला. या सामन्यात रिंकू सिंगने चौफेर फटकेबाजी करत मैदानात अक्षरक्षा धावांचा पाऊसच पडला. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत रिंकू सिंगने पाच लगातर षटकार ठोकून सामना खिशात घातला. आख्खा क्रिकेटविश्वात रिंगू सिंगच्या वादळी खेळीची चर्चा सुरु आहे. कारण रिंकूने पाच षटकारांच्या जोरावर नवीन पाच विक्रमांना गवसणी घातली आहे. रिंकूने २१ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकार ठोकून ४८ धावांची नाबाद खेळी केली. कोणत्याही फलंदाजासाठी हे पाच विक्रम मोडणे भविष्यात एक मोठं आव्हानच असणार आहे.