सुनील नरिन आणि गौतम गंभीर या हुकुमी खेळाडूंच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सहाव्या हंगामातही जितबो रे चा नारा दिला. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुनील नरिनने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजांना जखडून ठेवले.  नरिनच्या दबावतंत्रामुळे दिल्लीचा डाव १२८ धावांतच आटोपला. दुसऱ्या सत्रात कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने सूत्रधाराची भूमिका निभावताना ४२ धावांची सुरेख खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या गंभीरने केलेली आश्वासक खेळी त्याच्या चाहत्यांना सुखावणारी होती.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे १२९ धावांचे आव्हान पेलताना मनविंदर बिस्लाला अनुभवी आशिष नेहराने झटपट बाद केले. छोटय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना नाइट रायडर्स कोसळणार की काय अशी भीती कोलकाताच्या चाहत्यांना वाटू लागली. मात्र गंभीर-कॅलिस या अनुभवी जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅलिसने आपली विकेट गमावली. त्याने ५ चौकारांसह २३ धावा केल्या. कॅलिस बाद झाल्यावर मनोज तिवारी गंभीरच्या साथीला आला. या दोघांनी ४१ धावांची भागीदारी करत धावफलक हलता ठेवला. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या गौतम गंभीरला जोहान बोथाने पायचीत करत ही जोडी फोडली. गंभीरने ५ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा केल्या. गंभीरपाठोपाठ तिवारीला नदीमने बाद करत नाइट रायडर्सना अडचणीत टाकले. मात्र यानंतर इऑन मॉर्गन आणि युसफ पठाण या जोडीने दिल्लीला कोणताही संधी दिली नाही आणि कोलकाता नाइट रायडर्सने सहा विकेट्सनी हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, सुनील नरिनच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार महेला जयवर्धनेने कडवा प्रतिकार केला. सहाव्या हंगामाच्या आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेट लीने उन्मुक्त चंदला त्रिफळाचीत केले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरने चार खणखणीत चौकार वसूल केले. मात्र जादुई फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नरिनने पहिल्याच षटकांत वॉर्नरचा काटा काढला. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणारा मनप्रीत जुनेजाही झटपट परतला. फटकेबाजी करण्याच्या नादात नमन ओझाही तंबूत परतला. राजस्थान रॉयल्सकडून डेअरडेव्हिल्सकडे दाखल झालेला जोहान बोथाही चमक दाखवू शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज तंबूत परतत असताना महेला जयवर्धनेने आक्रमकता आणि बचाव यांचा सुरेख मिलाफ साधत ६६ धावांची शानदार खेळी साकारली. त्याने ८ चौकार आणि १ षटकारांची लयलूट केली. ब्रेट लीने त्याला बाद केले. इरफान पठाण, आंद्रे रसेल आणि आशिष नेहराला बाद करत नरिनने दिल्लीचा डाव लांबणार नाही, याची काळजी घेतले. त्याने ४ षटकांत अवघ्या १३ धावा देत ४ बळी घेतले. ब्रेट ली आणि रजत भाटियाने प्रत्येकी २ बळी टिपत नरिनला चांगली साथ दिली.
अक्षय कुमार, इम्रान, सोनाक्षीची उपस्थिती
आयपीएलच्या सहाव्या हंगामाच्या पहिल्यावहिल्या सामन्याला बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि इम्रान खान यांच्यासह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा उपस्थित होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे त्रिकुट ईडन गार्डन्सवर हजर होते. ‘‘ईडन गार्डन्सवर हजारो प्रेक्षकांच्या साथीने सामना बघण्याचा आनंद अवर्णनीय असतो,’’ असे अक्षय कुमारने सांगितले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स- २० षटकांत सर्वबाद १२८ (माहेला जयवर्धने ६६, डेव्हिड वॉर्नर २१, सुनील नरिन ४/१३, रजत भाटिया २/ २३) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स- १८.४ षटकांत ४ बाद १२९ (गौतम गंभीर ४२, जॅक कॅलिस २३, मनोज तिवारी २३, शाहबाज नदीम २/२२).
सामनावीर : सुनील नरिन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा