KKR player Liton Das withdraws from IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टिरक्षक लिटन दासने हंगामाच्या मध्यभागी संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तो २८ एप्रिल रोजी बांगलादेशला परतला. कौटुंबिक कारणामुळे लिटन दासने हा निर्णय घेतला आहे. आता तो या मोसमातील पुढील सामन्यांमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. केकेआर संघ व्यवस्थापनाने या वृत्ताला दुजोरा दिला असून या मोसमात त्याच्या पुढील खेळाबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लिटन दास बांगलादेशला परतला –
केकेआरकडून अधिकृत निवेदन जारी करताना असे म्हटले आहे की, ”लिटन दास बांगलादेशला त्याच्या कुटुंबाला आलेल्या वैद्यकीय समस्येमुळे परतला आहे. आम्ही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला या संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा देतो.” लिटन दासच्या जाण्यानंतर केकेआर संघात केवळ बांगलादेशचा एकच खेळाडू उरला आहे, तो म्हणजे वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान. यापूर्वी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले होते.
फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली –
लीग सुरू झाल्यानंतर लिटन दास आयपीएल २०२३ मध्ये केकेआरमध्ये सामील झाला. कारण स्पर्धा सुरू झाली तेव्हा तो बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. संघात सामील झाल्यानंतर, त्याला अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. लिटन दासने या सामन्यात खराब फलंदाजी केली आणि मुकेश कुमारच्या चेंडूवर चुकीचा पुल शॉट खेळून तो अवघ्या 4 धावांवर बाद झाला. एवढेच नाही तर या सामन्यात त्याची यष्टिरक्षणही अत्यंत खराब होते. त्याने दिल्लीचे खेळाडू अक्षर पटेल आणि ललित यादव यांना स्टंपिंग करण्याची संधी गमावली होती.
हेही वाचा – IPL 2023 CSK vs RR: संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानची कमाल! सीएसके विरुद्ध नोंदवला ‘हा’ खास पराक्रम
त्या सामन्यात ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने केकेआर विरुद्ध विजय मिळवला. जो सलग पाच पराभवानंतर दिल्लीचा हा पहिला विजय ठरला. दुसरीकडे, केकेआरबद्दल बोलायचे झाले तर, आरसीबीला पराभूत करण्यापूर्वी या संघाने सलग चार सामने गमावले होते आणि आता हा संघ या लीगमध्ये ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
लिटन दासची टी-२० कारकीर्द –
लिटन दासने आपल्या कारकिर्दीत १८० टी-२० सामन्यांमध्ये ४०५५ धावा केल्या आहेत, तसेच यष्टिरक्षक म्हणून त्याने ९० झेल आणि २६ स्टंपिंग केले आहेत. त्याला केकेआरने प्रथमच आयपीएलमध्ये ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. या मोसमात तो केकेआरसाठी फक्त एकच सामना खेळू शकला.