Shakib Al Hasan Out Of IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामाला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. अशात शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा आणि बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकीब-अल हसन आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात १.५ कोटी रुपये देऊन शाकिबचा संघात समावेश केला होता.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना ८ एप्रिल ते १ मे या कालावधीतच आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर शाकिब आता काही दिवसात केकेआर संघात सामील होणार होता, परंतु क्रिकबझच्या वृत्तानुसार, शाकिबने संघ व्यवस्थापनाला काही वैयक्तिक कारणे दिली आहेत, ज्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत आता शाकिबच्या जागी संघात कोण सामील होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामात करोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली लागण
शाकीबच्याऐवजी कोणत्या तीन खेळाडूंना केकेआर संधी देऊ शकते जाणून घ्या –
दासुन शनाका –
कोलकाता नाईट रायडर्ससाठी श्रीलंकेचा दासुन शनाका सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. श्रीलंकेचा कर्णधार दासूनने गेल्या काही महिन्यांत टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने मधल्या फळीत वेगवान फलंदाजी आणि धारदार गोलंदाजी करून सामन्याचा मार्ग अनेकदा बदलला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने गेल्या वर्षी आशिया चषकही जिंकला होता. तो मध्यम वेगवान गोलंदाजी तसेच फलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीत शाकिबऐवजी केकेआर दासूनला संघात समाविष्ट करू शकते, ज्यांच्याद्वारे त्याला कर्णधारपदाचा चांगला पर्यायही मिळू शकतो.
मोहम्मद नबी –
या यादीतील दुसरा खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आहे. मोहम्मद नबी जगभरातील टी-२० लीगमध्ये क्रिकेट खेळतो. त्याला टी-२० फॉरमॅटचा खूप अनुभव आहे. तो शाकिबप्रमाणे फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजीही करू शकतो. मोहम्मद नबीलाही कर्णधारपदाचा अनुभव आहे. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्सही या खेळाडूला शाकिबच्या जागी खेळवू शकते.
अॅडम मिल –
या दोन खेळाडूंशिवाय केकेआर आपल्या संघात शाकिबऐवजी एका वेगवान गोलंदाजाचाही समावेश करू शकते. पहिल्या सामन्यात उमेश यादव, टीम साऊथी आणि शार्दुल ठाकूर यांनी केकेआरसाठी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली होती, परंतु त्यांच्यापैकी वेगवान गोलंदाज नाही, तथापि, केकेआरकडे लॉकी फर्ग्युसनच्या रूपात एक पर्याय आहे, परंतु तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीत शाकिबच्या जागी अॅडम मिल हा त्याच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.