Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates:आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगने कहर केला. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात केकेआरला सामना जिंकण्यासाठी २९ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या यश दयालवर रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकत सामना जिंकला. या आपल्या खेळीने रिंकू सिंगने केकेआरचा मालक शाहरुख खानलाही वेड लावले.
शाहरुख खानने रिंकू सिंगसाठी केले खास ट्विट –
या सामन्यात रिंकू सिंगने २२८.५७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत एकूण १ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रिंकूच्या या शानदार खेळीनंतर शाहरुख खानने ट्विटमध्ये पठाणच्या स्टाईलमध्ये रिंकू सिंगची पोस्ट शेअर केली आहे. ट्विटमध्ये रिंकूचे कौतुक करताना शाहरुख खानने लिहिले, “झूम जो रिंकू!!!” शाहरुख खानचे हे ट्विट रिंकू सिंगसाठी रिटर्न गिफ्ट असेल.
अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांचेही कौतुक केले –
शाहरुख खानने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “माझी मुले रिंकू, नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर, तुम्ही सुंदर!!! आणि लक्षात ठेवा की विश्वास आहे की हे सर्व आहे.” या सामन्यात केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी त्याचा स्ट्राईक रेट २०७ पेक्षा जास्त होता. याशिवाय कर्णधार नितीश राणाने २९ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावा केल्या.
केकेआरच्या सीईओला हृदयाची काळजी घेण्यास सांगितले –
या ट्विटमध्ये शाहरुखने केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांना आपल्या हृदयाची काळजी घेण्यास सांगितले आहे. हा अत्यंत रोमांचक सामना होता. शाहरुख खानने त्याच्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “शुभेच्छा केकेआर आणि वेंकी मैसूर तुमच्या हृदयाची काळजी घ्या सर!”