KKR vs GT, Sai Sudarshan: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात गुजरातचा संघ अनुभवी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघावर भारी पडला. हा सामना गुजरातने ३९ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर साई किशोरने अनुभवी गोलंदाज राशिद खानबद्दल मन जिंकणारं वक्तव्यं केलं आहे.
राशिद खान हा टी –२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. जगभरातील टी –२० लीग स्पर्धांमध्ये त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. मात्र आयपीएलच्या गेल्या २ हंगामात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. गेल्या संपूर्ण हंगामात त्याला केवळ १० गडी बाद करता आले होते. तर या हंगामातील ८ सामन्यांमध्ये त्याला ६ गडी बाद करता आले आहेत. त्याची ही कामगिरी पाहता, अनेकांनी त्याला संघाबाहेर बसवण्याचा सल्ला दिला. मात्र आता साई सुदर्शनने स्पष्ट केलं आहे की, संघ त्याला पाठीशी घालणार आहे. संघातील खेळाडूंना त्याच्यावर विश्वास आहे.
काय म्हणाला साई सुदर्शन?
या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला राशिद खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, “ तो जगातील सर्वोत्कृष्ट टी –२० गोलंदाजांपैकी एक आहे. आता तो पुन्हा एकदा विकेट घेण्याच्या मूडमध्ये परतला आहे. आम्हा सर्वांना त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये काय बोललं जातं याकडे आम्ही लक्ष देत नाही..” असं म्हणताच, निक नाईट म्हणाला, “आम्ही शंका नव्हतोच घेत, आम्हाला त्याची क्षमता माहिती आहे.”
संघाने दाखवलेला विश्वास आज राशिद खानने सार्थ ठरवला. राशिदने मोक्याच्या क्षणी २ महत्वपूर्ण गडी बाद केले. या डावात गोलंदाजी करताना त्याने आक्रमक सलामीवीर फलंदाज सुनील नरेनला अवघ्या १७ धावांवर तर विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला २१ धावांवर माघारी धाडलं. हे दोघेही फलंदाज टिकले असते, तर सामना गुजरात टायटन्सच्या हातून निसटला असता.