IPL 2025 Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Highlights: शुबमन गिल, साई सुदर्शन यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर गुजरातने १९८ धावांची मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत कोलकाताला १५९ धावांतच रोखलं.
IPL 2025 GT VS KKR Highlights: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
कोलकाताची शरणागती; गुजरातचा ३९ धावांनी विजय
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्स संघावर ३९ धावांनी विजय मिळवला.
कृष्णाचा अफलातून झेल; रमणदीप तंबूत
धावगतीचं आव्हान आवाक्याबाहेर जात असताना कोलकाताच्या विजयाच्या आशा मावळत चालल्या आहेत. रमणदीप सिंग बाद झाला आहे.
रशीदच्या फिरकीसमोर आंद्रे रसेल निरुत्तर
रशीद खानच्या फिरकीसमोर आंद्रे रसेलने सपशेल शरणागती स्वीकारली. रसेलने २१ धावा केल्या.
रहाणे वॉशिंग्टन सुंदरच्या जाळ्यात
अर्धशतकानंतर लगेचच अजिंक्य रहाणे वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्याने ५० धावांची खेळी केली.
रहाणेचं तिसरं अर्धशतक
कर्णधारपद आणि लौकिकाला साजेसा खेळ करत अजिंक्य रहाणेने अर्धशतक पूर्ण केलं.
वेंकटेश अय्यर तंबूत
साईकिशोरने भरवशाच्या वेंकटेश अय्यरला माघारी परतावलं. त्याने १४ धावा केल्या.
रशीदने नरिनला परतावलं तंबूत
फटकेबाजीसाठी प्रसिद्ध सुनील नरिनला गुजरातच्या रशीद खानने तंबूत परतावलं. नरिनने १७ धावांची खेळी केली.
गुरबाझ माघारी; रहाणे-नरिनवर भिस्त
क्विंटन डी कॉकच्या जागी संधी मिळालेला रहमनुल्ला गुरबाज मोठी खेळी करू शकला नाही. गुरबाजच्या जागी कर्णधार अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. सुनील नरिन-अजिंक्य रहाणे जोडीने पॉवरप्लेचा फायदा उठवत चौकार लगावले आहेत.
जोस बटलरचा तडाखा; गुजरात १९८
जोस बटलरच्या २३ चेंडूत ४१ धावांच्या बळावर गुजरातने १९८ धावांची मजल मारली. तत्पूर्वी शुबमन गिलने ९० तर साई सुदर्शनने ५२ धावांची खेळी केली.
रिंकू सिंगचा अफलातून झेल आणि गिल माघारी
शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शुबमन गिलला वैभव अरोराने बाद केलं. रिंकू सिंगने जमिनीलगत झेपावत सुरेख झेल टिपला. गिलने ९० धावांची खेळी केली.
साई सुदर्शन माघारी
आंद्रे रसेलने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या साई सुदर्शनला बाद करत सलामीची जोडी फोडली. सुदर्शनने ३६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली.
साई सुदर्शनचे आणखी एक अर्धशतक
डावखुरा शैलीदार फलंदाज साई सुदर्शनने यंदाच्या हंगामात आणखी एका अर्धशतकाला गवसणी घातली.
शुबमन गिलचे अर्धशतक
कोलकाताच्या इडन गार्डन्स इथे खेळण्याचा अनुभव असलेल्या शुबमन गिलने सुरेख खेळ करत अर्धशतक पूर्ण केलं.
गिल-सुदर्शनची सावध सुरुवात
शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी खेळपट्टीचा नूर ओळखून सावध सुरुवात केली आहे.
दोन्ही संघ कसे आहेत?
कोलकाता नाईट रायडर्स
रहमनुल्ला गुरबाज, सुनील नरिन, अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर्स- मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, रोव्हमन पॉवेल, लुनिथ सिसोदिया.
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, शेरफन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल टेवाटिया, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेयर्स- इशांत शर्मा, करीम जनत, महिपाल लोमरुर, अनुज रावत, अर्शद खान
कोलकाताने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला असून, त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
क्विंटन डी कॉकच्या जागी मिळणार का गुरबाजला संधी?
कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामात म्हणावा तसा सूर गवसलेला दिसत नाहीये. दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉकला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. अशा परिस्थितीत कोलकाता अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाजला संधी देऊ शकतं.
KKR vs GT Live: कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?
कोलकाता नाईट राडयर्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ या स्पर्धेतील बलाढ्य संघ आहेत. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान केकेआरने १ तर गुजरातने २ वेळेस बाजी मारली आहे. तर एक सामना रद्द झाला होता.